• Sun. Mar 8th, 2026
    मित्र बनला शत्रू, किरकोळ विषय, पण राग अनावर, अक्षरश: जीव घेतला, कोल्हापूर हादरलं

    कोल्हापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अतिशय क्षुल्लक कारणावरुन एका मित्राने दुसऱ्या मित्राला अक्षरश: जीवे मारले आहे. या घटनेची सध्या कोल्हापुरात चर्चा होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यातील टोप परिसरात घडलेल्या एका भयंकर घटनेने परिसर हादरून गेला आहे. संभापूर गावच्या हद्दीतील बिरदेव मंदिराच्या मागील शेतात कामगारांसाठी बांधलेल्या खोल्यांमध्ये सोमवारी रात्री किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. मंगल विभीषण मांझी (वय 35, मूळ ओडिसा) या गवंडी मजुराचा चाकूने भोसकून खून करण्यात आला असून, या हल्ल्यात त्याचा सहकारी संजय निहाल हा देखील जखमी झाला आहे. घटनेनंतर काही तासांतच शिरोली एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी देवश्री प्रफुल्ल चंदन (वय 25) याला अटक केली आहे.

    परप्रांतीय कामगारांमधला वाद

    मृत मंगल मांझी हे मूळचे ओडिसा राज्यातील असून, गेल्या काही वर्षांपासून ते संभापूर येथील बिरदेव मंदिराच्या पिछाडीस असलेल्या शेतातील भाड्याच्या खोल्यांमध्ये इतर कामगारांसह राहत होते. त्यांची पत्नी आणि मुलं ओडिसामध्ये राहतात. बांधकाम क्षेत्रात कार्यरत राहून त्यांनी आपल्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली होती. सोमवारी दुपारी देवश्री प्रफुल्ल चंदन हा मजूर देखील म्हणजे यांच्या खोलीमध्ये राहण्यासाठी आला होता. यापूर्वी तो गंधर्व फाटा परिसरात राहत होता, मात्र सतत वाद निर्माण केल्यामुळे त्याला तिथून बाहेर काढण्यात आले होते.

    नेमकं काय घडलं?

    सोमवारी रात्री सर्व कामगारांनी नेहमीप्रमाणे एकत्र जेवणाची तयारी केली होती. त्यावेळी मद्यपान सुरू असताना मंगल मांझी आणि देवश्री यांच्यात भाजी चिरण्याच्या काही किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला तो वाद शाब्दिक असला, तरी काही क्षणांतच देवश्री याचा संताप अनावर झाला. त्याने जवळ ठेवलेला चाकू उचलून मंगलवर हल्ला चढवला. धोका ओळखून मंगलने घराबाहेर पळ काढला, परंतु संतापलेल्या देवश्रीने त्याचा पाठलाग करत त्याच्यावर चाकूने पोटात खोलवर वार केला. वार गंभीर झाल्याने मंगल जमिनीवर कोसळले.

    मध्यस्थी करायला आलेला देखील जखमी

    आरडाओरडा ऐकून इतर मजूरही धावत बाहेर आले. संजय निहाल यांनी देवश्रीला आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही देवश्रीने हातावर चाकूचा वार केला. घटनेनंतर गंभीर जखमी झालेले मंगल मांझी आणि संजय निहाल यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना मंगलचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. देवश्री प्रफुल्ल चंदन यास अत्यंत मद्यधुंद अवस्थेत अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली एमआयडीसी पोलीस करत आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा