• Sun. Mar 8th, 2026
    जमीन खरेदी व्यवहार वादानंतर पार्थ पवारांना वडिलांचाच मोठा धक्का, काय घडलं पाहा

    NCP Star Campaigner List : जमीन खरेदी व्यवहारात वादग्रस्त ठरलेले पार्थ पवार यांना वडील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच धक्का दिला आहे

    पार्थ पवार अजित पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. खास प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आगामी नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. जमीन खरेदी व्यवहारात वादग्रस्त ठरलेले पार्थ पवार यांना यातून वगळण्यात आले आहे. तसेच, रुपाली पाटील-ठोंबरे यांनाही या यादीतून डच्चू देण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचेही नाव या यादीत नसून त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव आराम देण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

    नगरपरिषद आणि पंचायतीसाठी निवडणुकीचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून २ डिसेंबरला त्यासाठी मतदान होणार आहे. महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर जाहीर टीका करणाऱ्या रुपाली पाटील-ठोंबरे यांना या यादीत स्थान मिळालेले नाही. वगळण्यात आलेल्या नावांमध्ये राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांचाही समावेश करण्यात आलेला नाही.

    छगन भुजबळ यांचे नावही या यादीत नसल्याने दिवसभर चर्चा रंगली होती. त्यावर सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले. भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलेले नाही. या निवडणुकांसाठी ते उपलब्ध नसले तरी जिल्हा परिषद आणि पालिकेच्या निवडणुकीसाठी ते उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.

    स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार , राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, अण्णा बनसोडे, अदिती तटकरे, इंद्रनील नाईक, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे, प्रताप पाटील-चिखलीकर, नवाब मलिक, सयाजी शिंदे, मुश्ताक अंतुले, समीर भुजबळ, अमोल मिटकरी, सना मलिक-शेख, रुपाली चाकणकर, इद्रिस नायकवडी, अनिकेत तटकरे, झिशान सिद्दीकी, राजेंद्र जैन, सिद्धार्थ कांबळे, सुरज चव्हाण, लहू कानडे, कल्याण आखाडे, सुनील मगरे, नाझेर काझी, महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, सुरेखा ठाकरे, नजीब मुल्ला, प्रतिभा शिंदे, विकास पासलकर आदींचा समावेश आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा