Vinayak raut critisiesed mahayuti gov: विनायक राऊत यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे पक्ष एकमेकांचे घोटाळे उघड करत आहेत. महायुती सरकारमध्ये मोठ्या घोटाळ्यांवर कारवाई होत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची तयारी सुरू आहे.
पुण्यातील भूघोटाळ्याचा उल्लेख; सरकारवर गंभीर आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जिल्हा कार्यकारणी बैठक पार पडली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, महाराष्ट्रात सध्या देवाभाऊंचं नव्हे तर ‘लुटारु राजकारण’ सुरू आहे. जमिनी लाटणे, ठेकेदारांना देयकं न देणं, बेकायदेशीर व्यवहार करून स्वतःची झोळी भरणं — अशी प्रकरणं दैनंदिन गोष्टी झाल्या आहेत. पुण्यात पार्थ पवार यांच्याबाबतचा भूघोटाळा इतका मोठा आहे की बँका लुबाडून परदेशात पळून गेलेल्यांनाही तो लाजवेल. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्या घरातच असा गैरप्रकार होत असताना शासन लोकांचा कसा विश्वास राखणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अजित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर अंबादास दानवेंचा हल्लाबोल, राजीनाम्याचा पुन्हा उल्लेख, ‘पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?’ दानवेंचा प्रश्न
शिंदे, अजित पवार आणि भाजप ‘एकमेकांचे भेद खोलणारे’
महायुती सरकार आल्यानंतरही मोठमोठ्या घोटाळ्यांवर कारवाई झालेली नाही, असं राऊत म्हणाले. भाजप शिंदे गटाचा भ्रष्टाचार उघड करत आहे, शिंदे गट अजित पवार गटाचे कर्तृत्व बाहेर आणतोय, आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष भाजपकडे बोट दाखवतात; त्यानंतर देवेंद्र फडणवीस चौकशी समित्या नेमतात. त्यामुळे तिन्ही सत्ताधारी पक्ष परस्परांच्या तंगड्या ओढण्यात मश्गूल असून राज्यकारभार मात्र गोंधळात हरवला आहे, अशी टीका त्यांनी केली.
राऊत यांनी म्हटलंय की, “एकनाथ खडसे यांना वाळीत टाकून त्यांच्यावर कारवाई केली गेली, मग अजित पवारांच्या मुलावर कारवाई का नाही? जर प्रामाणिकपणा असेल तर अजित पवारांनी तात्काळ राजीनामा देऊन चौकशीत सहकार्य करावं.” जगदंबेकडे या सत्ताधाऱ्यांच्या विसर्जनाची प्रार्थना केल्याचंही त्यांनी उपरोधिक भाषेत सांगितलं.
कोल्हापुरात ठाकरे गटाची निवडणूक तयारी जोरात
कोल्हापूर जिल्ह्यात आमदार किंवा खासदार नसतानाही आगामी नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठी चढाओढ होणार आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी उमेदवारी दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दिलेल्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसने सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा शिवसैनिकांची आहे. यासाठी राऊत यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं.
“शिवसेना संपवण्यासाठी महाराष्ट्र गहाण ठेवला”
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या दबावाखाली शिवसेना संपवण्यासाठी महाराष्ट्र गहाण ठेवला, असा आरोप राऊत यांनी बोलताना केला. मात्र महाराष्ट्रातील जनता त्यांना योग्य धडा शिकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान पत्रकार परिषदेला पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख आमदार सुनील प्रभू, अरुणभाई दूधवाडकर, नितीन बानुगडे-पाटील, विजय देवणे आणि जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

