• Mon. Aug 3rd, 2026

    बचतगटांचे सक्षमीकरण, महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 3, 2026
    बचतगटांचे सक्षमीकरण, महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    सांगली, दि. ३ (जि. मा. का.) – महिला बचतगटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळते. त्यामुळे महिला बचतगटांना केवळ आर्थिक मदत देण्याबरोबरच, प्रत्येक महिलेला लखपती दीदी बनवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे शासनाचे ध्येय आहे. महिलांना प्रशिक्षण, उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी भांडवल आणि बचत गट निर्मित उत्पादने विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशा विविध माध्यमांतून महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

    मिरज तालुक्यातील सावळी येथे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), सांगली यांच्या वतीने आयोजित महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विहानराजे मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे, नवप्रभा लोकसंचलित साधन केंद्र मिरजच्या अध्यक्ष मनिषा पाटील, सावळीच्या सरपंच सन्मती गणे आदि उपस्थित होते.

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महिला कुटुंब घडवत असते. महिला भगिनी कोणत्याही परिस्थितीत न डगमगता खंबीरपणे उभे राहतात. या पार्श्वभूमिवर, कौटुंबिक जबाबदारीत आर्थिक योगदान देण्याइतपत महिलांना सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचा संकल्प केला आहे. या माध्यमातून प्रत्येक महिलेचे वार्षिक उत्पन्न एक लाख होईल, यासाठी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात महिलांना कर्जपुरवठा करण्यासाठी महिला बँक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात सांगली जिल्ह्याने पुढाकार घेत सांगली जिल्हा लाडकी बहीण सहकारी पतसंस्था स्थापन केली आहे. त्याचे प्रत्येकी 700 रूपयांचे शेयर्स असून त्याचे प्रातिनिधीक वितरण आज करण्यात आले. या माध्यमातून गरजू महिलांना कर्जपुरवठा करण्यात येईल. कर्जप्राप्त महिलांना उद्योग व्यवसाय उभारण्याची संधी प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सांगली जिल्हा लाडकी बहीण सहकारी पतसंस्थेचे शेअर्स व महिला उद्योजिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने लाभार्थी महिलांना कर्जधनादेश वितरण करण्यात आले.

    माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे यांनी प्रास्ताविक केले. श्री. उमराणीकर यांनी आभार मानले. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्र मिरजच्या 16 व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांनी स्वागत गीत सादर केले. महिला व बालविकास विभागांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिला बचतगटांच्या प्रतिनिधी, लाभार्थी महिला, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    00000

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed