Maharashtra Kesari Sikandar Shaikh Arrested : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी असलेला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याच्यासह चौघांना सीआयए पथकाने शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाबमधून अटक केली आहे.
सिकंदरचे वडील काय म्हणाले?
सिकंदर शेख याचे वडील पैलवान रशीद शेख यांनी त्यांची भूमिका मांडताना स्पष्टपणे सांगितलं आहे की, ‘सिकंदरने अतीशय मेहनतीनं आणि कष्ट करून नाव कमविले आहे. अवैध शस्त्र प्रकरणात त्याला गोवलं जात आहे. मी आणि माझी बायको हज करून आलोय, आम्ही लबाड बोलत नाही. माझा मुलगा सिकंदर हा हिंद केसरीची तयारी करत होता. त्याअगोदर ही घटना घडणं म्हणजे, काहीतरी षडयंत्र आहे’, असा आरोप सिकंदरचे वडील रशीद शेख यांनी केला आहे.
Pune Crime : पुण्यात पुन्हा ‘गँगवॉर’, वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या भावाला संपवलं; सहा राऊंड फायर
अत्यंत गरिबीत सिकंदर शेखला पैलवान केलं
आंतरराष्ट्रीय पैलवान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. सिकंदरचे वडील रशीद शेख हे आजही मार्केट यार्डात हमालीचं काम करत संसाराचा गाडा हाकत आहेत. लहानपणापासून सिकंदरला कुस्तीची आवड असल्यानं सिकंदरला मोहोळ तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी मदत केली. त्यानंतर त्याला कोल्हापूर येथील गंगावेस तालमीत कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी पाठवलं. सिकंदरचे वडील रशीद शेख यांनी बोलताना सांगितलं की, ‘अत्यंत गरीबीत आम्ही दिवस काढले. एकदाही बेईमानी केली नाही. माझ्या मुलाला आम्ही कष्टाच्या पैशांनी पैलवान केलंय. आमचा सिकंदर कधीच असं कृत्य करणार नाही’, असा विश्वास रशीद शेख यांनी व्यक्त केला.
Crime News : वडिलांचा पानटपरीवर शॉक लागून अपघाती मृत्यू, मुलाचा टपरीच्या मालकावर संताप, लेक पुण्याहून गावी आला अन्…
स्पर्धेत सहभागी होऊ नये यासाठी कटकारस्थान?
सिकंदर शेख याच्या वडिलांनी या सर्व घटनेवर संशय व्यक्त केला आहे. ‘महाराष्ट्र केसरीची स्पर्धा विजयी झाल्यानंतर सिकंदर नेहमी पंजाब आणि हरियाणा या राज्यात जाऊन अनेक कुस्त्या खेळत होता आणि विजयी होत होता. हिंद केसरी स्पर्धेत पंजाब आणि हरियाणाच्या पैलवानांचा बोलबाला असतो. त्यामुळे सिकंदरला या हिंद केसरी स्पर्धेत सहभागी होता येऊ नये यासाठी हे सर्व षडयंत्र आहे का?’ असा संशय पैलवान रशीद शेख यांनी व्यक्त केला आहे.

