- पुण्यात सीएआरए ची पश्चिम विभागीय सल्लामसलत कार्यशाळा
मुंबई , दि. ४ : विशेष गरजा असलेल्या बालकांना कायमस्वरूपी, प्रेमळ आणि आधार देणारे कुटुंब मिळावे यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. दत्तक प्रक्रियेची व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्यपूर्ण सहकार्य, जनजागृती आणि सर्व घटकांमधील प्रभावी समन्वय आवश्यक असून, दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी कुटुंबाधारित संगोपनाला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.
केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत कार्यरत केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाने (सीएआरए) विशेष गरजा असलेल्या दिव्यांग बालकांच्या दत्तक प्रक्रियेला आणि कुटुंबाधारित संगोपनाला अधिक बळकटी देण्यासाठी पश्चिम विभागीय चौथी प्रादेशिक सल्लामसलत कार्यशाळा पुणे येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
सीएआरएच्या ‘दत्तक जागरूकता अभियान २०२५’ अंतर्गत महाराष्ट्र शासन आणि राज्य दत्तक संसाधन संस्था (एसएआरए), यांच्या सहाय्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ‘विशेष गरजा असलेल्या दिव्यांग बालकांच्या संस्थाबाह्य पुनर्वसनाला प्रोत्साहन’ ही या अभियानाची संकल्पना आहे. विशेष गरजा असलेल्या बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि पोषक कौटुंबिक वातावरण उपलब्ध करून देणे तसेच त्यांचे कुटुंबाधारित संगोपन आणि दत्तक प्रक्रियेला प्रोत्साहन देणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
महाराष्ट्र, गुजरात, गोवा तसेच दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या पश्चिम विभागाची भौगोलिक आणि प्रशासकीय व्याप्ती मोठी आहे. या पार्श्वभूमीवर कार्यशाळेत ७४ हून अधिक जिल्ह्यांतील सुमारे १५० भागधारकांनी सहभाग नोंदविला होता. या माध्यमातून दत्तक प्रक्रिया, बालकांचे पुनर्वसन, अनुभवांची देवाणघेवाण आणि विविध संस्थांमधील समन्वय यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले होते.
यावेळी सीएआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव भावना सक्सेना म्हणाल्या की, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये विशेष गरजा असलेल्या ३९४ बालकांना दत्तक घेण्यात आले असून, आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील ३१३ दत्तकांच्या तुलनेत ही वाढ २५ टक्के आहे. विशेष गरजा असलेल्या अधिकाधिक बालकांना कायमस्वरूपी कुटुंबाधारित संगोपनाची संधी मिळावी, यासाठी सर्व संबंधितांनी अधिक व्यापक आणि समन्वित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सक्सेना यांनी नमूद केले.
या कार्यशाळेत राज्य दत्तक संसाधन संस्था (एसएआरए), विशेष दत्तक संस्था (एसएए), बाल संगोपन संस्था (सीसीआय), जिल्हा बाल संरक्षण कक्ष (डिसीपीसी), मुख्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच बाल संरक्षण क्षेत्रातील विविध तज्ज्ञ आणि अधिकारी सहभागी झाले होते.
चौकट
दत्तक प्रक्रियेत राज्य देशात अव्वल-फ्रान्सपासून वर्ध्यापर्यंत… सात बालकांना मिळाले हक्काचे घर
बालकांना संस्थात्मक संगोपनाऐवजी सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंब मिळावे, या उद्देशाने महिला व बालविकास विभागामार्फत दत्तक प्रक्रिया राबविण्यात येते. ही प्रक्रिया केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (सीएआरए) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि ऑनलाइन प्रणालीद्वारे पारदर्शकपणे पूर्ण केली जाते. दत्तक इच्छुक पालकांची नोंदणी, आवश्यक पडताळणी, बालकाची जुळवणी आणि कायदेशीर दत्तक आदेश अशा विविध टप्प्यांनंतर बालकाला कायदेशीररित्या नवीन कुटुंब मिळते. या प्रक्रियेमुळे बालकांच्या सर्वोत्तम हिताला प्राधान्य देत त्यांना प्रेम, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक कौटुंबिक आधार मिळतो. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात राज्य दत्तक प्रक्रियेत देशात अव्वल ठरले होते.
नागपूर येथे ऑनलाइन दत्तक प्रक्रियेद्वारे सात बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंबाचा आधार मिळाला आहे. फ्रान्स, मुंबई, पुणे आणि वर्धा येथील दत्तक इच्छुक पालकांसाठी कायदेशीर दत्तक आदेशाची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.
ही प्रक्रिया बालकांच्या सर्वोत्तम हिताला प्राधान्य देत संस्थात्मक संगोपनाऐवजी त्यांना प्रेमळ कौटुंबिक वातावरण मिळवून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे दत्तक प्रक्रियेत पारदर्शकता, सुलभता आणि कार्यक्षमता वाढून सात बालकांच्या आयुष्यात सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्याची नवी सुरुवात झाली आहे.
0000
श्रद्धा मेश्राम/विसंअ