जनावरांच्या गोठ्यात बनावट नोटांचे रॅकेट चालवले जात होते. पोलिसांनी सिनेस्टाईल धाड टाकत 68 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नोटांच्या छपाईचा कट उघड
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयसिंगपूर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री जनावरांच्या गोठ्यावर छापा टाकला. यामध्ये साहिल रफिक मुलाणी (वय 26, रा. उदगाव, शिरोळ), ओंकार बाबूलाल तोवार (रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले सध्या रा. दानोळी ता. शिरोळ) आणि अविनाश संतराम पाटील (वय 29, रा जुना चंदुर रोड, बरगेमळा इचलकरंजी ता. हातकणंगले) अशी आरोपींची नावे आहेत. या कारवाईत आरोपींकडून बनावट 100 रुपयांच्या 684 नोटा, छपाईसाठी वापरलेला एचपी कंपनीचा स्मार्ट टँक 525 मॉडेलचा प्रिंटर, प्रिंटरच्या कॅटरिज कटर, टेप अशी विविध तांत्रिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. तर अधिकृत नोटेच्या आयकार्ड सिरीयल प्रमाणे नक्कल तयार केल्याचे देखील पोलिसांना आढळले आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारचा मोठा निर्णय, अध्यादेश निघाला, GR वर बच्चू कडू काय बोलणार?
गोठ्यात चालवले जात होते रॅकेट
उदगांव गावत असणाऱ्या बसवेश्वर नगर येथील बरगेमळा येथील साहील मुलाणी यांच्या जनावरांच्या गोठ्यात बनावट नोटांचे रॅकेट चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार याबाबत माहिती मिळताच दिनांक 30 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास तात्काळ पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन कारवाई केली. यावेळी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इचलकरंजी, दानोळी आणि उदगाव येथील तरुणांचा समावेश आहे. प्राथमिक चौकशीत या रॅकेटचा सूत्रधार स्थानिक ग्रुप असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तर आणखी काही व्यक्ती या रॅकेटमध्ये सामील असल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.
‘शिवरायांच्या किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभं केलं तर फोडून टाकणार’, राज ठाकरेंचा मोठा इशारा
दरम्यान, शिरोळ तालुक्यात सध्या गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र वाढताना दिसून येत आहे. त्यातच आता बनावट नोटांच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून तपासाचे चक्र वेगात सुरू असून पुढील कार्यवाहीसाठी विशेष पथकाकडून तपास केला जाऊ शकतो.

