विधानसभा निवडणुकीनंतर शिंदेसेना आणि भाजपमध्ये ठाणे व नवी मुंबईत संघर्ष वाढला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक यांना शह देण्यासाठी नवी मुंबईत राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत.
माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढल्याची चर्चा आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील भाजपचा चेहरा म्हणून ओळखले जातात. भाजपचा हाच चेहरा आता शिंदे यांच्या अधिक संपर्कात आहे. नवी मुंबईत पश्चिम महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी ३० ऑक्टोबरला आयोजित संवाद मेळाव्याला स्थानिक भाजप नेत्यांना न बोलावता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या पक्षाचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. नरेंद्र पाटील यांची ही कृती बरीच सूचक मानली जात आहे.
नवी मुंबईतील मेळाव्याच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून नव्या समीकरणांची जुळजाजुळव केली जात आहे. यातून एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबतच दोन्ही पवारांवर कुरघोडी करत राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. एपीएमसीमध्ये कांदा-बटाटा मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी १० वाजता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी मुंबईत माथाडी कामगारांची मतं लक्षणीय आहेत. ही मतं आपल्या बाजूनं वळवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे.
नवी मुंबईच्या राजकारणातील मुख्य चेहरा असलेले गणेश नाईक काही महिन्यांपासून शिंदेंना ठाण्यात धक्का देण्याचा प्रयत्न करत आहे. ठाण्यातील शिंदेंच्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठी नाईक सातत्यानं प्रयत्न करत असताना आता शिंदेंनी नवी मुंबईत नाईकांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी पाऊल टाकलं आहे. पाटील यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला एकनाथ शिंदेंसह मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई, खासदार नरेश म्हस्के यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. पण वनमंत्री गणेश नाईक आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं गेलेलं नाही.

