“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचा घात केला”, असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले. तसेच 2029 मध्ये ओबीसींचा मुख्यमंत्री असेल, असा देखील दावा लक्ष्मण हाके यांनी केला.
“आम्ही जीआर विरोधात मोर्चे काढत आहोत. पण शासनाने आम्हाला सकारात्मकता दाखवली नाही. मंत्री छगन भुजबळ यांच्यासह एक-दोन नेते वगळता शासनातील मंत्रिमंडळ आमच्या बाजूने बोलायला तयार नाही आणि त्यांचं शासन ऐकत नाही. त्यामुळे शासन आमच्या संरक्षण करण्यात अपयशी ठरलं आहे”, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
न्यायालय देखील आमची सुनावणी घ्यायला तयार नसल्याचे हाके म्हणाले. “शासनाने दोन सप्टेंबर रोजी काढलेला जीआर हा ओबीसीचा गळा घोटणारा आहे. पण मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये ओबीसी समाज टिकणार नाही आणि ओबीसी आरक्षणाचा अर्थ संपवून गेलेला आहे. जोपर्यंत जीआर रद्द होणार नाही तोपर्यंत आमची आंदोलन सुरू राहणार”, असं ते म्हणाले.
दरम्यान, “नांदेडच्या मोर्च्यावरून ओबीसींमध्ये फूट पडल्याची चर्चा आहे. पण ओबीसींमध्ये कुठलीच फूट पडली नाही. छगन भुजबळ हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याची माहिती आहे आणि विजय वडेट्टीवर हे चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची काही कारणं असतील, पण आम्ही एकत्र आहोत. आमच्यासोबत जनता आहे”, असं हाके म्हणाले.
“गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या बाजूने भूमिका घेणारे भुजबळ आहेत, वडेट्टीवर आहेत, प्रकाश आंबेडकर आहेत , ओबीसींचे आंदोलक आहेत. या सर्वांची भूमिका ओबीसींचं आरक्षण टिकले पाहिजे अशीच आहे, ते भले वेगवेगळ्या पक्षात आहेत, तरी ओबीसींचं आरक्षण टिकलं पाहिजं ही त्यांची भूमिका आहे. आम्ही ओबीसी बांधव आहोत आणि सर्वांची इच्छा आहे की ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजं. काही आमचे हेवे-दावे असतील ते चार भिंतीत बसून मिटवून घेऊ”, असं देखील लक्ष्मण हाके म्हणाले.
ओबीसीने ओबीसीला मतदान करावं, असं आवाहन लक्ष्मण हाके यांनी केलं. “वेळ पडली तर ओबीसीने एससी आणि एसटीला मतदान करायचं. ज्या ज्या पक्षाने ज्या खासदार आमदारांनी मूग गिळून बघायची भूमिका घेतली त्या माणसाला त्याच्या प्रतिनिधींना ओबीसी निवडणार नाही, असंही ते म्हणाले. बोगस कुणबी प्रमाणपत्राद्वारे जो ओबीसींच्या जागेवर उभा राहील, त्याला खड्यासारखं बाजूला ओबीसी करतील आणि मतातून उत्तर देतील”, असा घणाघात हाके यांनी केला.
दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. “जरांगे हे सकाळी एक, दुपारी एक आणि सायंकाळी एक बोलतात. जरांगेंना काहीही इशारा देऊ द्या. हे राज्य आमचे पण आहे, देश आमचा पण आहे. स्वराज्य स्थापन होत असताना आम्ही सुद्धा आमच्या जीवाची आहुती दिली आहे”, असं लक्ष्मण हाके म्हणाले.

