Satara Crime: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. आता पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. तरुणीने आत्महत्येपूर्वी एका संशयिताला ओढणीसह सेल्फी पाठवला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी संशयित आरोपी प्रशांत बनकरला लटकवलेल्या ओढणीसह सेल्फी घेऊन पाठवला होता. प्रशांत बनकरच्या मोबाईलमधून हा फोटो पोलिसांना मिळाल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. डॉक्टर तरुणीने मृत्यूआधी प्रशांतसोबत व्हॉट्सॲपवर चॅटिंग केले होते. पोलिसांनी प्रशांतचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी केली असता हा फोटो समोर आला. याबाबत एका मराठी वृत्त वाहिनीने वृत्त दिलं आहे.
महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःचा एक सेल्फी काढला होता. या सेल्फीमध्ये तिने गळफास घेण्यासाठी वापरलेल्या ओढणीचा फोटो होता. हा फोटो तिने संशयित आरोपी प्रशांत बनकर याला व्हॉट्सॲपवर पाठवला होता. पोलिसांनी प्रशांत बनकरचा मोबाईल जप्त केला. त्यानंतर, मोबाईलची डिजिटल तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान, डॉक्टरांनी पाठवलेला ओढणीचा सेल्फी पोलिसांच्या हाती लागला. डॉक्टरांनी मृत्यू होण्यापूर्वी प्रशांत बनकरसोबत व्हॉट्सॲपवर संभाषण केल्याचेही तपासात उघड झाले आहे.
चाकणकरांनी काय माहिती दिली होती?
डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी, तिच्या सुसाईड नोटमध्ये गोपाळ बदने व प्रशांत बनकर यांची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, जानेवारी ते मार्च या काळात तरुणीचे गोपाळ बदने याच्याशी संवाद होता, त्यानंतर तिचे प्रशांत बनकर याच्याशी बोलणे सुरू होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी फोनचे सीडीआर (Call Detail Record) काढले आहेत. या सीडीआरमधून जानेवारी ते मार्चपर्यंत डॉक्टर तरुणीचे गोपाळ बदने याच्याशी कम्युनिकेशन असल्याचे दिसून आले आहे. यानंतर तिचे प्रशांत बनकर याच्याशी कम्युनिकेशन सुरू होते, असे चाकणकर यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

