उपमुख्यमंत्री अजित पवार आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या पक्षात आज बड्या नेत्याचा प्रवेश झाला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी आपल्या मित्रपक्षांना टोला लगावला.
शहरातील संत एकनाथ रंग मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात अंबड-घनसावंगीचे माजी आमदार चोथे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश झाला. व्यासपीठावर आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, विजयसिंह पंडित, माजी आमदार सुरेश जेथलीया आदींची उपस्थिती होती.
वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते पक्षात येत आहेत. आणखी उद्या कोणी येतील. जुन्या-नव्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. ३१ जानेवारीपर्यंत या निवडणुका घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाला त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
बघता बघता निवडणुका येतील. अशावेळी या निवडणुकींना कार्यकर्त्यांनी मजबुतीने सामोरे जावे. पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. सामाजिक ऐक्य राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. आज वेगवेगळ्या जाती-धर्माच्या समाजामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत. प्रश्न सुटले पाहिजेत याबद्दल सकारात्मक आहोत. हे प्रश्न सुटत असताना कोणावर अन्याय होणार नाही, ही काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायची असते, असेही पवार म्हणाले.
‘बिनबुडाचे आरोप’
पाठबंधारे खात्याचा मंत्री असताना माझ्यावर बिनबुडाचे आरोप झाले. कारण नसताना मला बदनाम करण्यात आल्याची सिंचन घोटाळ्यावरील आरोपाबाबतची सल अजित पवार यांनी पुन्हा बोलून दाखविली. नाथसागर धरणापासून बाभळी बंधाऱ्यापर्यंत छोटी-छोटी धरण करण्याचेच काम आपण केले. आज या भागात ऊस, कापूस, तूर, सोयाबीनसह ज्या फळबागा दिसतात, ते त्यामुळेच असे अजित पवार म्हणाले.
‘दसऱ्यापर्यंत मदत’
राज्यात वेगवेगळ्या भागात विशेत: मराठवाड्यात जालना, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर अशा भागात मुसळधार पाऊस झाला. अनेक गावांमध्ये अतिशय पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे पवार यांनी सांगितले. पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले, जनावरे दगावली, पाण्यात अडकली. तातडीने पंचनामे करून सरकारला कळविण्याचे निर्देश देण्यात आले असून दसऱ्यापर्यंत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर मदत जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही पवार यांनी सांगितले.

