• Sat. Mar 14th, 2026
    राधाकृष्ण विखे पाटील यांनी सस्पेन्स वाढवला, मराठा समाजाला आजच आरक्षण जाहीर होणार?

    आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांचं शिष्टमंडळ मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानाच्या दिशेला निघालं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. राज्य सरकारच्या गेल्या पाच दिवसांपासून मॅरेथॉन बैठका पार पडल्या. या बैठकांनंतर अखेर मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार सरकारकडून एक मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यात कायद्याच्या चौकटीत बसेल असा निर्णय मराठ्यांसाठी घेण्यात आला आहे. हा मसुदा राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन दाखवणार आहेत. या मसुदा मनोज जरांगे यांना मान्य झाला तर मराठ्यांना आरक्षणाच्या या लढाईत ऐतिहासिक विजय मिळाल्याचं सिद्ध होणार आहे. सरकारच्या मसुद्यात नेमकं काय आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण लवकरच त्याबाबतची माहिती समोर येईल.

    “उच्च न्यायालयाच्या निर्देशांवर आपण भाष्य करु शकत नाही. हायकोर्टाच्या निर्देशांप्रमाणे आवश्यक कारवाई सरकार करेल. आमच्या उपसमितीने जे काही मुद्दे उपस्थित झाले होते, गेले दोन-तीन दिवस चर्चा करुन अंतिम मसुदा तयार केला आहे. तो मसुदा घेऊन आम्ही मनोज जरांगे पाटील यांनी भेटणार आहोत. त्याबाबत काही सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा आहे”, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

    “उपसमितीच्या वतीनेच न्यायमूर्ती संदीप शिंदे जाऊन आले होते. त्यातून उपस्थितीत केलेल्या मुद्द्यांवर चर्चा झाली. उपसमिती ही मंत्रिमंडळाने तयार केलेली समिती आहे. निर्णय समितीला घ्यायचे होते. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर जे मुद्दे सांगण्यात आले त्यावर उपसमितीने कायदेशीर मत घेतलं, विस्ताराने चर्चा झाली. कायद्याच्या चौकटीत बसणारा प्रस्ताव आपण तयार केलेला आहे”, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.

    “माझ्या समवेत आमच्या उपसमितीचे शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, माणिकराव कोकाटे सोबत मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येणार आहेत. तसेच मंत्रिमंडळातील इतर सदस्य हे चर्चेत उपस्थित होते. उपसमितीचे सदस्य सचिव, वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी हजर आहेत”, असं विखे पाटील म्हणाले.

    “मसुद्यात काय आहे त्याबाबत मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर जाहीर होईल. शासनाच्या मसुद्याचा प्रस्तावावर मनोज जरांगे समाधानी होतील, असं वाटतं. शासनाने गंभीर गुन्हे मागे घेण्याबाबत भूमिका मांडलेली आहे. मसुद्यात सगळे विषय आहेत”, असे संकेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

    “कायद्याच्या चौकटीत बसणारा निर्णय घ्यावा लागेल. कारण आपण आता तातडीने निर्णय घेतला आणि तो उद्या कोर्टात टिकला नाही तर मराठा बांधवांचा विश्वासघात होईल. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी एवढा वेळ लागला”, असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा