Ahilyanagar Fire : अहिल्यानगर येथून मोठी बातमी समोर आली आहे. नेवासा तालुक्यामध्ये फर्निचर या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृतांमध्ये अवघ्या सात वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.
दुर्दैवी मृत्यू झालेल्यांमध्ये –मयूर अरुण रासने (वय 45) पायल मयूर रासने (वय 38) अंश मयूर रासने (वय 10) चैतन्य मयूर रासने (वय 7) तसेच एकावृद्ध महिला सिंधुबाई चंद्रकांत रासने (वय 85) यांचा समावेश आहे. रासने कुटुंब दुकानाच्या वरील भागात वास्तव्यास होते. मध्यरात्रीनंतर अचानक लागलेल्या आगीचा धूर घरभर पसरला आणि गाढ झोपेत असलेल्या या कुटुंबाला शुद्धी येण्यापूर्वीच मृत्यूने कवेत घेतले. आई-वडील, दोन चिमुरडी मुले आणि वृद्ध आई अशा पाच जीवांचा एकाच वेळी घेतलेला बळी पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर यश किरण रासने वय २५ याची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान मयूर यांचे वडील अरुण रासने आणि मयूर यांची आई दोघे नातेवाईकांकडे मालेगाव येथे गेले असल्याने ते बचावले आहे.
झोपेतून उठण्याचा सल्ला देणाऱ्यांवर अण्णा हजारे भडकले; म्हणाले, 90 व्या वर्षी मी काम करतो आणि तुम्ही…
शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे मात्र आग लागल्याचे कारण तपासातून निष्पन्न होईल. लाकडी वस्तू आणि ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याचे बोलले जात आहे.आगीत संपूर्ण फर्निचरचे दुकान भस्मसात झाले असून एकावर अद्याप उपचार सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.दरम्यान, निष्पाप चिमुकल्याचा मृत्यू, मायबापांची आक्रांत आणि वृद्ध आजीचा करुण अंत… या हृदयद्रावक घटनेने नेवासा शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

