Anna Hazare News: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर पुण्यामध्ये लावण्यात आलेल्या एका बॅनरमधून टीका करण्यात आली होती, ज्यामुळे ते संतप्त झाले आहेत. 90 व्या वर्षीही काम करत असल्याचा हवाला देत, त्यांनी टीकाकारांना मागील कार्याची आठवण करून दिली आहे.
पुण्यातील बॅनरवरून प्रसारमाध्यमांनी हजारे यांना बोलते केले. त्यावेळी हजारे म्हणाले, “आतापर्यंत मी भरपूर काम केले आहे. भ्रष्टाचार होऊ नये यासाठी आंदोलने करून पाठपुरावा करून 10 कायदे करण्यात यश मिळाले आहे. त्यातून माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदलीचा कायदा, लोकपाल, लोकआयुक्त असे 10 वेगवेगळे कायदे झाले. आता वय झाले. मी 90 वर्षांचा झाल्यानंतरही मी काम करत राहायचे आणि तुम्ही झोपून राहायचे? अशी जर कोणी अपेक्षा करत असेल तर हे चूक आहे. माझ्याकडे बोट दाखविण्यापेक्षा मागच्या काळात मी जे केले ते आजच्या तरुणांनी करावे,” अशी अपेक्षा अण्णा हजारेंनी व्यक्त केली आहे.
भाजपकडून एकाच वेळी ठाकरेंसह शिंदेंवरही कुरघोडी? महत्त्वाच्या बैठकीतून पालकमंत्र्यांचेच नाव वगळल्याने खळबळ
दरम्यान, “कोणावर टीका करण्यापेक्षा हे काम करणे हे आपले कर्तव्य आहे की नाही? मी देशाचा नागरिक आहे, या देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांची देखील आठवण ठेवीन, अशी भावना तरुणांमध्ये निर्माण झाली पाहिजे. फक्त कोणाकडे बोट दाखवायचे आणि हे करा, ते करा असे म्हणून काहीच होणार नाही. तरुणांनी जागे व्हावे. मी आजच्या तरुणांकडे मोठ्या अपेक्षेने पहातो आहे. युवा शक्ती एक राष्ट्र शक्ती आहे. ही युवा शक्ती जागी झाली तर देशाते चांगले भविष्य दूर नाही. मी हे कायदे आणले आणि तरुणांच्या हाती दिले. आता त्याआधारे पुढे काम करण्यापेक्षा एवढ्या वर्षांनंतर मलाच प्रश्न विचारले जात असल्याचे कानावर येत आहे,” असेही हजारे म्हणाले.

