Raigad News : रायगडमधील आगरकोट किल्ल्यावर अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. इथे नेहमी पर्यटकांची गर्दी असते. पण आज किल्ल्यावर अनपेक्षित घटना घडली आहे. एका महिलेच्या डोक्यावर बुरज कोसळला. यामुळे संबंधित महिला जखमी झाली आहे.
स्वातंत्र्य दिन, दही हंडी याची सुट्टी जोडून रविवारची अशी तीन दिवसाची सुट्टी एकत्रित आल्याने पुणे, मुंबई येथील नागरिक पर्यटनासाठी रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आले आहेत. पुणे येथून अबोली श्रीकांत देशपांडे हे कुटुंबासोबत पर्यटनासाठी अलिबाग तालुक्यात आले होते. त्यांचे वास्तव्य नागाव येथे होते. अबोली देशपांडे आणि त्यांचे पती श्रीकांत देशपांडे हे आज पर्यटनासाठी अलिबाग तालुक्यातील जगप्रसिद्ध असलेल्या रेवदंडा येथील आगरकोट किल्ल्यात पर्यटनासाठी आले होते.
देशपांडे दाम्पत्य रविवारी रेवदंडा येथील ऐतिहासिक आगरकोट किल्ला आणि प्रसिद्ध सातखणी बुरुज पाहण्यासाठी गेले होते. देशपांडे दांपत्य हे आगरकोट किल्ल्याची सफर करत असताना ते सातखणी बुरुजाजवळ पोहोचले आणि या ठिकाणी दुर्देवी घटना घडली.
फिरून झाल्यावर बुरुजाजवळ ठेवलेली बॅग आणण्यासाठी जाताच क्षणी बुरुजाचा सिमेंटचा काही भाग अचानक ढासळला. हा भाग अबोली श्रीकांत देशपांडे यांच्या डोक्यावर कोसळला. यावेळी या ठिकाणी असलेल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढे अलिबाग येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आगरकोटमधील या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये पुरातत्व विभागाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
“नकाशावरून किल्ला गायब करण्याचा डाव”
या घटनेमुळे ऐतिहासिक वारशाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगरकोट किल्ला आणि सातखणी बुरुज अत्यंत जीर्णावस्थेत आहे. इथे पर्यटकांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत आहे. तज्ज्ञांचे मत आहे की,”तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून बुरुजांची दुरुस्ती सुरू करणे आवश्यक आहे. धोकादायक ठिकाणी इशारा फलक लावणे सक्तीचे असावे. पर्यटकांसाठी सुरक्षितता उपाययोजना करणे विलंब न लावता सुरू कराव्यात. दरम्यान, पुरातत्व विभाग, महसूल खाते आणि राज्य शासन जाणूनबुजून या किल्ल्याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा रंगली आहे. काहींच्या मते,”आगरकोट किल्ल्याचे जतन न करता, त्याला नकाशावरून आणि गुगलवरून गायब करण्याचा डाव सरकारी अधिकाऱ्यांचा आहे. पैशाच्या हव्यासापोटी हा किल्ला बिल्डर लॉबीकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
केंद्र-राज्य सरकारला मागणी
पर्यटक आणि स्थानिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय पुरातत्त्व विभाग, राज्यपाल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच मंत्री आशिष शेलार यांच्याकडे तातडीने लक्ष घालून इतिहासकालीन आगरकोट किल्ल्याचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे.

