Manoj Jarange Patil : मराठा नेते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी मुंबईवर मोर्चा काढणार आहेत. येत्या 29 ऑगस्टला त्यांचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहे. मनोज जरांगे यांचा मुंबईत आल्यास वाहतुकीचा मोठा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. यामुळे सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण मनोज जरांगे मोर्चा काढण्यावर ठाम आहेत.
लातूर दौरा पूर्ण केल्यानंतर गुरुवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांचं नांदेड जिल्ह्यात आगमन झालं. गुरुवारी रात्री लोहा तालुक्यातील मारतळा येथे समाज बांधवाची बैठक घेतली. मुंबईला मोर्चा काढणार असून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. यानंतर त्यांनी शुक्रवारी दिवसभर विश्रामगृह येथे मराठा बांधवाशी संवाद साधला.
फडणवीसांकडून मराठा समाज संपवण्याचा विडा
“मराठा आरक्षणासाठी दोन वर्षांपासून लढा सुरु आहे. सरकारला याची जाणीव आहे. जाणूनबुझून आरक्षण द्यायचं नाहीये. मराठा समाजाचं कस वाटोळं होईल आणि मराठा समाज कसा संपेल, याचा विडा उचलला आहे”, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. “मी पण खमक्या आहे. कच्या तालमीतला नाही. २९ ऑगस्टला बघू सरकारमध्ये किती दम आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढणार”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“आरक्षणासाठी मी शेवटपर्यंत लढणार. कोणत्याही परिस्थिती मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार”, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. “या मोर्चात पाच पटीने मराठा बांधव मोर्चात सहभागी होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. मी थकलो तरी मुंबईला जाणार. माझ्या शरीराला किंमत नाही, मेलो तरी चालेल. कोणाचाही बाप आडवा येऊ दे. मराठ्यापढें निभाव टिकू देणार नाही आणि ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार”, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला.
‘सतत उपोषण आणि उपाशी राहिल्याने माझं शरीर झिझलंय’
मोर्च्याच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. लातूर नंतर ते नांदेड दौऱ्यावर होते. “दौरे आणि सारखी बैठक यामुळे मला घाम आला आणि चक्कर आली. कितीही तब्येत खालवली तरी माझ्या मराठा बांधवाना आरक्षण मिळून देणार. २९ ऑगस्टची लढाई ही शेवटची लढाई आहे, कोणही घरी राहू नये, असं आवाहन त्यांनी यावेळी केले. मराठा समाजाला जाणून बुझवून टार्गेट केल जातं आहे. मराठा समाजातील मुलं-मुली मोठे होऊ नये असा त्यांचा हेतू आहे, पण समाजातील मुलं मोठे व्हावे हे माझं स्वप्न आहे. डॉक्टरांनी सलाईन लावण्याचा प्रयत्न केला. पण सलाईन लागली नाही. सुया टोचून टोचून माझं शरीर जरजर झालं आहे. मला उभं देखील राहता येतं नाहीय. त्यामुळे मी लढत आहे. तुम्ही पण मोर्चात सहभागी व्हा”, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवाना केले.
“मराठा आरक्षणासाठी भाजपमधील मराठा नेत्यांच्या मनात पण खदखद आहे . कारण त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांनी सत्तेवर बसवले आहे. मराठ्यांशिवाय सत्ता येणे शक्य नाही. भाजपच्या आमदार, खासदारांना निवडून दिले. आज तेच म्हणत आहेत की, मी ओबीसींसाठी लढणार. मराठ्यांसाठी लढणार नाही, असं फडणवीस म्हणत आहेत. मुंबईत आले तर पोलीस बघून घेतील, असं फडणवीस यांचं वक्तव्य आहे . त्या दिवसापांसून मराठे चिडले. आता मराठे म्हणत आहेत, बघू कोण रोखते आम्हाला, हीच परिस्तिथी भाजपातील मराठ्यांमध्ये आहे”, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.

