• Sat. Aug 1st, 2026
    Tukaram Mundhe : तीनवेळा अपयशाने खचलो होतो, तुकाराम मुंढेंनी जेन-झींना दिला यशाचा कानमंत्र

    अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा संवादाचा कार्यक्रम आज अमरावतीत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला. हजारो विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमरावती : “मी तुमच्यासमोर एक वरिष्ठ सनदी अधिकारी दिसतो. मला बऱ्याच उपमा दिल्या गेल्या. पण मी कोणत्याही उपमेच्या लायकीचा नाहीय. पण ज्यावेळेस मी यशस्वी झालो 2005 मध्ये त्याआधी 1997, 1998, 1999 या तीन प्रयत्नांमध्ये मी केवळ मुलाखतीपर्यंत पोहोचू शकलो होतो. यश आणि अपयशाने खचून गेलो होतो”, असं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. अमरावतीत तुकाराम मुंढे यांनी हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.

    “मी 2000 साली विचार केला की, हातात काहीतरी असावं म्हणून एमपीएससी परीक्षा दिली. त्याचा निकाल 2003 ला लागला. चार वर्षे त्यामध्ये गेले. त्यानंतर मी मधल्या काळात नोकऱ्या केल्या. मी आज यशस्वी दिसतोय. पण त्यामागचे अपयश याचा अभ्यास आपण करणार आहोत का? आपण रिल्सपाहून स्वत:ची तुलना करुन न्युनगंडात चुकीचे निर्णय घेतले तर ती शोकांतिका आहे. ती शोकांतिका होऊ द्यायची नाही यासाठी मी संवाद करण्यासाठी आपल्यासमोर आलो आहे”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

    तुकाराम मुंढे काय-काय म्हणाले?

    “इमॅजिन करा, रात्रीचे अकरा वाजले आहेत, अमरावती असेल, नागपूर असेल, नागालँड असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, पॅरिस असेल, खेडेगाव असेल, लाईट बंद झाली आहे. सर्वजण झोपले असतील. बेडवर तरुण मुलं-मुली पडलेले आहेत. निळसर रंगाची छाप आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे, कारण मोबाईल सुरु आहे. मोबाईलवर अंगठा सुरु आहे. स्क्रोल करण्यासाठी अंगठा सुरु आहे. इन्स्टा, फेसबुक, ट्विटर असेल, स्क्रोल केलं जातं.”

    “रिल्स पाहून आपण हसतो. काहीतरी जोक असतो. स्क्रोल करताना बेरोजगारीने राग येतो. स्क्रोल केल्यावर कुणीतरी नट-नटी दिसतात, चांगले श्रीमंत, तेव्हा मत्सर वाटतं. आई-वडिलांसारखे येतात, गाडी-बंगला दिसतो, तेव्हा प्रश्न पडतो मी कुठे आहे? माझा मार्ग तर चुकला नाही ना? मी कुठे कमी पडतोय? नक्कीच आपलं नट-नटींबरोबर तुलना सुरु होतं. त्यावेळी आपल्यामध्ये न्यूनगंड सुरु होतो.”

    ‘न्यूनगंडचा प्रश्न सोडवायला हवा’

    “आज सर्वात मोठा धोका तरुण पिढीला आणि आई-वडिलांना सतावत असेल तर तो आजच्या पिढीत तयार झालेला न्यूनगंड आहे. हा सर्वात मोठा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे.”

    “यावरुन अनेक जण टीका करतात की, जेन-झी आळशी आहेत. मोबाईल शिवाय त्यांना वेगळं कळत नाही. खरं जग कळत नाही. त्यांना माणूस म्हणून जगण्याची आवश्यकता वाटत नाही. ते वेगळ्याच विश्वात राहतात, अशाप्रकारे टीका केली जाते. मला वाटतं. ते योग्य नाही.”

    ‘आपल्याला केवळ यश दिसतं, अपयश नाही’

    “आपण डिजीटल युगात राहतोय. मोबाईलपासून दूर जाण्याची गरज नाही. पण कुठेतरी चुकतोय. कुठे चुकतोय हे बघण्याची गरज आहे. तुम्ही ज्यावेळेस स्क्रोल करतात त्यातून तुमच्यात जो न्यूनगंड निर्माण झाला आहे कारण तुम्ही रिलमधील असलेल्यांसोबत तुलना करत आहात. रिलवर येण्याआधी संबंधित नटाने 100 वेळा चुका केलेल्या असतात. त्याने वर्षानुवर्षे प्रयत्न केलेले असतात. आपल्याला त्याचं अपयश दिसत नाही तर केवळ यश दिसतं”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.