Pune NCP News: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी स्वबळावर लढण्याचे संकेत प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहेत. महायुती असली तरी, जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती कराव्यात, पण कार्यकर्त्यांना तिकीट मिळायला हवे, असं पटेल म्हणाले.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे इथं ऑफिस असणं खूप गरजेचं होतं. म्हणूनच अजित पवार आणि पार्थ पवार यांनी लक्ष घालून हे ऑफिस उभं केलं आहे. आपण आता महायुतीत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिथे जिथे शक्य असेल तिथं जरूर युती करावी, पण जिथे शक्य नाही तिथे परिस्थिती पाहून निर्णय करावा. मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरी चालतील, पण केवळ तिकिट मिळालं नाही म्हणून आपला कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात जायला नको. मी तर म्हणतो पुण्यात आपण 162 जागांची तयारी केली पाहिजे,” असं म्हणत पटेल यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीचा धसका? ‘बेस्ट’ निवडणुकीआधी मोठी घडामोड; ‘त्या’ 2 नोटिसांमागे नेमकं कोण?
दरम्यान, “मतचोरीचा आरोप करून राहुल गांधी महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. विरोधक हे गोबेल्स नीतीचा अवलंब करून लोकांना मतचोरीचा मुद्दा पटवून देऊ पाहत आहेत, त्याला आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे,” असं मतही प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
स्वबळावर लढण्याविषयी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. “आज शहराच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन झालं आहे. प्रचंड राजकीय इच्छा शक्ती असलेला आमचा पक्ष आहे. राज्यात आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, मात्र अनेक शहरातील राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे याबाबत राज्याचे तीन नेते अंतिम निर्णय घेतील,” असं तटकरेंनी म्हटलं आहे.

