Eknath Shinde Delhi Visit : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणावर फरक पडणार का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदे दिल्लीत जावून भाजपच्या एका बड्या नेत्याची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. पण याबाबत अधिकृत अशी कोणतीही माहिती नाही. शिंदेंचा दिल्ली दौरा महाराष्ट्राच्या राजकारणाला कुठपर्यंत घेऊन जाणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे.
या सगळ्या घडामोडींनंतर एकनाथ शिंदे पुन्हा आज रात्री दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे शिंदे नुकतंच काही दिवसांपूर्वी म्हणजे याच आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यानंतर ते परत दिल्लीला गेले आहेत. याशिवाय गेल्या महिन्यात महाराष्ट्र विधीमंडळाचं अधिवेशन सुरु असताना 12 जुलैच्या रात्री एकनाथ शिंदे अचानकपणे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी तर त्यांच्या जवळच्या मंत्र्यांनादेखील त्यांच्या दिल्ली दौऱ्याची खबर नव्हती.
एकनाथ शिंदे 30 आणि 31 जुलैच्या दिवशी संसदेचं अधिवेशन सुरु असताना दिल्लीत होते. त्यांनी दिल्लीत खासदारांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. तसेच वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यासोबतच देशभरातील विविध राज्यांच्या प्रमुख नेत्यांसोबत एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. यानंतर एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या दुपारपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये असतील. पण ते दिल्लीत कोणाच्या भेटीगाठी घेणार? ते अद्याप समजू शकलेलं नाही.
आदित्य ठाकरे यांची टीका
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. “एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यासह ते गावाला किती वेळा गेले ते सुद्धा पाहा. 15 दिवसांत चंद्र वेगवेगळा बदलतच असतो”, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
ठाकरे पिता-पुत्रही दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत
दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे देखील दिल्लीला जाणार आहेत. ठाकरे पिता-पुत्र राहुल गांधी यांच्या घरी स्नेहभोजनाला देखील जाणार आहेत. स्वत: राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं आहे.

