• Wed. Mar 11th, 2026
    आता पक्ष प्रवेशातही घोटाळा? शिंदेंच्या नेत्याने बोगस यादी तयार केल्याचा आरोप; पक्षाच्या कारवाईकडे लक्ष

    Shivsena Party Membership : अहिल्यानगरमध्ये, मारुती मेंगाळ यांनी समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पण त्यांनी यामध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे. समर्थकांची बोगस यादी सादर केली. यामधील काही लोकांनी आपण पक्षप्रवेश केला नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य दौऱ्यापूर्वीच राजकीय वातावरण तापणार असल्याची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मोबीन खान, अहिल्यानगर : आर्थिक घोटाळा, जमीन घोटाळा, नोकरभरती घोटाळा असे घोटाळ्याचे एक ना अनेक प्रकार आपण ऐकले असतीलच. पण भामट्यांना मात्र आता चक्क पक्ष प्रवेशामध्ये घोटाळा केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेत समर्थकांसह प्रवेश करताना, अहिल्यानगर जिल्ह्यातील एका नेत्याने बोगस यादी सादर केल्याचा आणि पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य अहिल्यानगर जिल्ह्या दौऱ्याच्या आधीच पक्ष प्रवेश घोटाळ्याच्या आरोपाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊया.

    अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील मारुती मेंगाळ हे आदिवासी ठाकर समाजाचे मोठे नेते आहेत. मेंगाळ यांनी तीन महिन्यांपूर्वी आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत ठाणे येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आपल्या सोबत अकोले तालुक्यातील अनेक ग्रामपंचायचे सरपंच आणि सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते असल्याचा मोठा दावा मारुती मेंगाळ यांनी केला होता.

    मेंगाळ यांच्यासमवेत पक्षप्रवेश केलेल्या लोकांची यादी समोर आली आहे. यातील अनेक नावे बोगस असल्याचा आरोप आता होत आहे. यादीत नाव असणाऱ्या अनेकांनी आपले व्हिडिओ प्रसारित केले आहेत, ज्यामध्ये त्यांनी दावा केला आहे की, आपण पक्षप्रवेश केलाच नाही. या सगळ्या प्रकारानंतर शिवसेना शिंदे गटाचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘मारुती मेंगाळ यांच्या पक्ष प्रवेशावेळी पक्षाने आम्हाला कल्पना दिली नाही. काही दिवसांपूर्वी पक्ष प्रवेशाची यादी समोर आल्यानंतर अनेकांनी हरकती घेतल्या आहेत. शहानिशा केल्यानंतर यादीतील 40 ते 50 लोकांची नावे बोगस असल्याचे समोर आले आहे. पक्षाची आणि वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे आम्ही नेत्यांना कळवले आहे. या प्रकारामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असून वरिष्ठांनी योग्य तो निर्णय घ्यावा,’ असे दराडे म्हणाले.

    दरम्यान 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिनाचे औचित्य साधून मारुती मेंगाळ यांनी अकोले येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र शिंदे यांच्या संभाव्य दौऱ्यापूर्वीच मेंगाळ यांच्यावर पक्ष प्रवेश घोटाळा आणि पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे. या सगळ्या प्रकारानंतर एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा