महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर आज चांगलेच आक्रमक झाले. कोल्हापूरकरांनी आज राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक पदयात्रा काढली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला तेव्हा राजू शेट्टी यांनी आक्रमक भाषण केलं. त्यांनी ‘वनतारा’वर गंभीर आरोप केले. तसेच उद्योगपती अंबानींवर खोचक शब्दांत टीका केली.
‘एक दिवस महादेवी’साठी असं म्हणत सर्व कोल्हापूरकर या मूक पदयात्रेत सहभागी झाले. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातच ही पदयात्रा निघाली. महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आलं आहे. कोर्टाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीणीला तिकडे पाठवण्यात आलं आहे. महादेवी हत्तीणीला वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात नेत असताना गावकरी भावूक झाले होते.
लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत महादेवीला निरोप देत असताना भावूक झाले होते. यावेळी गोंधळ देखील झाला होता. पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली होती. तसेच कोल्हापूरच्या नागरिकांनी जिओवर बहिष्कार टाकला होता. तसेच महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सह्यांची स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. यानंतर आज कोल्हापूरच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रा नेली.
‘आपल्या माधुरीवर अन्याय, अंधा कानून’
“महादेवी हत्तीणी जात असताना आपल्याला आणि मंदिराला विसरली नाही. निरोप देत असताना तिच्या डोळ्यांत अश्रू होते. तिने जाताना मंदिराला अभिवादन केले, मगच तिने गावाचा निरोप घेतला होता. खरंतर आपल्या माधुरीवर अन्याय झाला आहे. तुम्हाला ‘अंधा कानून’ हा चित्रपट माहिती आहे. या चित्रपटात खोटे पुरावे तयार करुन कोर्ट नायकाला जन्मठेपेची शिक्षा देतं. तशीच परिस्थिती आपल्या माधुरीच्या बाबतीत झाली आहे”, असं राजू शेट्टी म्हणाले.
“महाराष्ट्र आणि देशात मुकेश आणि अनंत अंबानी यांचे गुलाम झाले आहेत, असं वाटत आहे. मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांनी प्राणी संग्रालय तयार केलं आहे. त्या प्राणी संग्रालयाचं नाव वनतारा आहे. या देशात प्राणी संग्रालय कुणी सुरु करावं, त्याला मान्यता कुणी द्यावी याला काही कायदे आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय प्राणी प्राधिकारण काम करतं. ते प्राधिकारण प्राणी संग्रालयाला प्राधान्य देण्याचं काम करतं”, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.
‘वनतारा बोगस संस्था, प्राण्यांची तस्करी होते’, गंभीर आरोप
“संभाजीनगरच्या एका वकिलाने माहितीच्या अधिकारी माध्यमातून वनताराची माहिती मिळाली. त्यांनी सांगितलं की, वनतारा नावाची प्राणी संग्रालय अस्तित्वात नाही. माझ्याकडे ते पत्र आहे. याचा अर्थ वनतारा ही संस्थाच बोगस आहे. या संस्थेमध्ये मुक्या जंगली प्राण्यांची तस्करी सुद्धा होते, अशी माझी माहिती आहे. वनतारामध्ये आतापर्यंत सव्वा दोनशे पेक्षा जास्त हत्ती आहेत. तरीही त्यांना आमची माधुरी आवडली. का? कारण ती अतिशय देखली आहे. सुशिक्षित आहे आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासारखी आहे. म्हणून तिच्याबद्दल खोटा रिपोर्ट संस्थेला करायला लावला. तिची देखभाल होत नाही, तिच्या पायाला जखमा आहेत, असे खोटे आरोप करण्यात आले”, असे आरोप राजू शेट्टी यांनी केले.
‘अंबानीला भीक मागायला लावा’
“जो नांदणी मठ 1200 वर्षांपूर्वी अस्तित्वात आला, ज्या नांदणी मठात 700 पेक्षा जास्त वर्षांपासून हत्ती सांभाळण्याची आणि वाढवण्याची परंपरा आहे. तो मठ भीक मागण्यासाठी हत्ती वापरतो, असा आरोप करण्यात आला आहे. आपल्या माधुरीचा 1 लाख रुपये खर्च आहे. अंबानीला भीक मागायला लावा. हत्ती बाळगणं हे अतिशय खर्चिक आहे. ही मठाची परंपरा आहे. म्हणून आपण सर्वजण तो खर्च करतो. माधुरी 35 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेतात खेळली बागळली पण कुणाचं नुकसान केलं नाही. हत्तीला राहण्याकरात अतिशय चांगलं वातावरण आपल्याकडे आहे”, असंदेखील राजू शेट्टी यावेळी म्हणाले.

