• Wed. Aug 5th, 2026
    Mumbai Police Salary Scam: मुंबई पोलिस वेतन घोटाळ्याची व्याप्ती वाढणार; आरोपींच्या कामाचे ऑडिट सुरु, 2 अधिकारी निलंबित

    Mumbai Police Salary Scam: कर्मचाऱ्यांचा डेटा जुन्या ‘सेवार्थ’ वेतन प्रणालीतून नवीन प्रणालीमध्ये स्थलांतरित करताना सहा कोटी ४१ लाखांचा गैरव्यवहार उघडकीस आला.

    मुंबई पोलिस वेतन घोटाळा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मुंबई पोलिस दलातील वेतन घोटाळा उघडकीस आल्यानंतर, या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. केवळ २०१९ आणि २०२०मध्ये नव्हे, तर सेवार्थ प्रणाली सुरू होण्यापूर्वीही अशाप्रकारे फेरफार झाल्याचा संशय असल्याने कामकाजाचे ऑडिट सुरू झाले असून तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला.

    उत्तर प्रादेशिक विभाग कार्यालयातील पोलिस निरीक्षकाच्या तक्रारीवरून, समतानगर पोलिस ठाण्यात प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर, विजया चव्हाण, प्रमुख लिपिक अजय राठोड, वरिष्ठ लिपिक अमोल मेश्राम या पाच जणांविरुद्ध सरकारची फसवणूक, पुरावे नष्ट करणे, कट रचणे अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी पोलिस नसलेल्या दहा व्यक्तींना पोलिस असल्याचे भासवून त्यांच्या बँक खात्यावर वेतन म्हणून पैसे वळविल्याचा आरोप आहे.

    Maharashtra TimesNCP SP : शरद पवारांच्या पक्षात मोठी घडामोड, सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या बरखास्त, पडद्यामागे काय घडतंय?
    आरोपींची गुन्हे पद्धत पाहता, हा घोटाळा केवळ दोन वर्षांपुरता मर्यादित नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जुन्या सेवार्थ प्रणालीदरम्यान त्यांनी हा गैरव्यवहार केला. मात्र त्यापूर्वी सर्व काम ऑफलाइन असतानाही, यांनी अफरातफर केल्याचा संशय आहे. म्हणून आरोपींनी याआधी ज्या ज्या कार्यालयांत कर्तव्य बजावले, त्या ठिकाणचा लेखाजोखा तपासला जात आहे. हे ऑडिट झाल्यावर घोटाळ्यातील रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ज्या दहा व्यक्तींच्या नावाने वेतन काढले, त्या कोण, याचा तपास सुरू आहे.

    Maharashtra TimesEknath Shinde: काँग्रेसने माफी मागावी! सुनेत्रा पवार यांच्याबाबतच्या पोस्टवरुन एकनाथ शिंदे यांची मागणी
    दोन आरोपी निलंबित
    वेतन घोटाळा उघडकीस आल्यानंतर, आरोपींपैकी तत्कालीन प्रमुख लिपिक आणि सध्या मरोळ येथील सशस्त्र पोलिस विभागातील कार्यालय अधीक्षक विजया चव्हाण आणि तत्कालीन कनिष्ठ लिपिक अमोल मेश्राम यांना पोलिस सहआयुक्तांनी निलंबित केले. एका आरोपीने २०२०-२१मध्ये राजीनामा दिला होता. पत्नीची आर्थिक स्थिती चांगली असल्याने नोकरीची आवश्यकता नसल्याचे त्याने नमूद केल्याचे समजते. मात्र, घोटाळा उघडकीस येण्याची चाहूल लागल्याने त्याने नोकरीचा राजीनामा दिला असावा, अशी चर्चा आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा