• Thu. Aug 6th, 2026
    Eknath Shinde: काँग्रेसने माफी मागावी! सुनेत्रा पवार यांच्याबाबतच्या पोस्टवरुन एकनाथ शिंदे यांची मागणी

    मुंबई : ‘जनतेने काँग्रेसला त्यांची जागा दाखवली आहे. काँग्रेसने हे समजून घ्यावे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत माफी मागावी’, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली.

    ‘अर्थखाते आणि राजकीय विषय हे एका बाजूला ठीक आहे. मुख्यमंत्री आहेत, मी आहे. त्या विषयावर निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत’, असे प्रत्युत्तर शिंदे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना दिले. तसेच, ‘अर्थखात्याच्या नावाखाली एका भगिनीचा अपमान करणे हे किती दुर्दैवी आहे. काँग्रेसची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का’, असा खरमरीत सवालही शिंदे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना केला. ‘अशाच लोकांमुळे काँग्रेसची ही स्थिती आहे. लोकांनी २०२४ साली काँग्रेसला त्यांची जागा दाखवली. आज त्यांची देशात, राज्यात काय स्थिती आहे. त्यांचे नेते परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. आज याच काँग्रेसच्या लोकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अपमान केला आहे, त्याबाबत त्यांनी माफी मागावी’, अशी मागणीही शिंदे यांनी केली.

    गुंगी गुडिया ही शिवी नाही
    सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ‘गुंगी गुडिया’ शब्द वापरला तो काही अपशब्द नाही, शिवी नाही, असंसदीय शब्द नाही. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही ‘गुंगी गुडिया’ असे संबोधले गेले होते. पण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून आपले कणखर नेतृत्व सिद्ध केल्याने अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना दुर्गा म्हटले. सुनेत्रा पवार यांनीही आपल्या कर्तृत्वातून दुर्गा असल्याचे दाखवून द्यावे’, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी दिली. ‘सार्वजनिक जीवनात वावरताना प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात. बीडमध्ये सुनेत्रा पवार यांच्या बाजूला बसलेला लोकप्रतिनिधी पत्रकाराला गप्प बसवतो, अशावेळी पवार एक शब्दही बोलत नाहीत व पत्रकारांचे प्रश्नही घेत नाहीत, अशावेळी गप्प बसातात, म्हणून गुंगी गुडिया हा शब्द वापरला आहे.

    महिलेच्या सन्मानावर झालेला आघात
    राष्ट्रवादीतील मंत्री छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ आणि दत्ता भरणे यांनीही काँग्रेसवर सडकून टीका केली. ‘ही केवळ एका व्यक्तीवर केलेली टीका नसून निष्ठा, कठोर परिश्रम, जनसेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर समाजात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सन्मानावर झालेला थेट आणि निषेधार्ह आघात आहे. हे विधान लोकशाही संस्कृतीला काळीमा फासणारे आहे’, अशी टीका सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी केली. या वादावर राजकीय वर्तुळातून टीका-टिप्पणी सुरू असताना राष्ट्रवादीचे शीर्षस्थ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मंगळवारी सायंकाळी ‘एक्स’च्या माध्यमातून काँग्रेसचा निषेध केला.

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed