• Sat. Mar 7th, 2026
    पोटावरुन चाक, हातावर जोर देत उठले; अपघातानंतरही बापाचं काळीज धडधडतं, म्हणाले माझ्या पोरींना तरी वाचवा

    Pune Baramati Father Daughters Accident : मृत्यूच्या दारात असताना ओंकार आचार्य यांचे “माझ्या मुलींना तेवढं वाचवा” हे करुण शब्द ऐकून सगळेच हेलावले

    बारामती अपघात (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    बारामती : बारामती शहरात रविवारी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अपघातात 36 वर्षीय ओंकार राजेंद्र आचार्य आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुली, दहा वर्षीय सई आणि अवघ्या चार वर्षांची मधुरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताविषयी काळजाला घरं पाडणारी माहिती समोर आली आहे.

    हायवा डम्परने धडक दिल्यानंतर ओंकार आचार्य दुचाकीसह खाली पडले, तर दोन चिमुरड्याही दुसऱ्या बाजूला पडल्या. यावेळी अंगावरुन चाक गेल्याने ओंकार यांच्या पोटापासून खालचा भागच धडावेगळा झाला. याही परिस्थितीत बापाचं काळीज धडधडत होतं. ते दोन हातांवर जोर देऊन उठण्याचा प्रयत्न करत होते. स्वतः मृत्यूच्या दारात असताना “माझ्या मुलींना तेवढं वाचवा” हे पित्याचे करुण शब्द काळजाला भोकं पाडणारे होते.

    दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर आणखी एक दुःखद बातमी समोर आली. मुलगा आणि नातवंडांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने ओंकार यांचे 70 वर्षीय वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचाही सोमवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण बारामतीतून हळहळ व्यक्त होत आहे.

    हा अपघात मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात रविवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडला होता. ओंकार आचार्य हे वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करत होते. आपल्या वडिलांसाठी फळे घेण्यासाठी खंडोबानगर येथील चौकात ते थांबले होते. शाळेतून मुलगी सईला घेऊन परत येताना डंपरच्या धडकेत चिरडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. डंपर चालक दशरथ दत्तात्रय डोळे याला पोलिसांनी अटक केली असून, बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    राजेंद्र आचार्य हे निवृत्त शिक्षक होते आणि त्यांची लोकप्रिय शिक्षक म्हणून ख्याती होती. ते महिनाभर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दोनच दिवसांपूर्वी घरी परतले होते. मात्र, मुलगा आणि नातवंडांच्या अकाली मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नाही. आचार्य कुटुंबात आता ओंकार यांची पत्नी अरुणा, आई शैलजा आणि भाऊ अमोल, वय 33 वर्ष, यांचा समावेश आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा