राज्यातील महायुती सरकारमधील काही मंत्री वादात सापडले आहेत. यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली. निवडणुकीआधी वादग्रस्त चेहरे दूर करण्याचा प्रयत्न आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्याआधी मंत्रिमंडळातील वादग्रस्त चेहरे दूर करण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न आहे. दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्ष नेतृत्त्वाशी याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी फडणवीस यांनी चर्चा केली.
फडणवीस यांच्या दिल्ली भेटीबद्दल भाजप च्या एका वरिष्ठ नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर महत्त्वाची माहिती दिली. ‘वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करुन अन्य मंत्र्यांसमोर उदाहरण ठेवण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न आहे. वादग्रस्त मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचं फडणवीस यांना वाटतं. ही बाब त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहे. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत पुढील आठवड्याच्या सुरुवातीलाच बैठक घेतील’, अशी माहिती भाजप नेत्यानं दिली.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं कारवाईच्या टायमिंगवर सूचक भाष्य केलं. ‘वादग्रस्त, अकार्यक्षम मंत्र्यांवर लगेच कारवाई होणार नाही. अन्यथा विरोधी पक्षाच्या हाती आयतं कोलीत मिळेल. त्यांच्याकडून या कारवाईचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न होईल,’ असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं सांगितलं.
शिंदेसेनेचे संजय शिरसाट, संजय राठोड, भरत गोगावले, योगेश कदम गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेले आहेत. त्यांच्या हकालपट्टीची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवळ , भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनाही मंत्रिपदावरुन दूर केलं जाऊ शकतं. महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे म्हणून ओळखले जातात. ते उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते आहेत.

