• Mon. Mar 9th, 2026
    कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण, पोलिसांना चकवण्यासाठी आरोपीने लूक बदलला, मनसैनिकांनी धरलाच

    Kalyan Marathi Receptionist Case : नांदिवली परिसरात अनेक जण ओळखत असल्यामुळे गोकुळने लूक बदलून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला, मात्र मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याची धरपकड करत पोलिसांकडे सोपवले

    कल्याण रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणातील आरोपी गोकुळ झा (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    कल्याण : कल्याण पूर्व भागातील नांदिवली परिसरात एका बाल चिकित्सालयातील रिसेप्शनिस्ट तरुणीला डॉक्टरना भेटण्यासाठी आलेल्या तरुणाने बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली. या घटनेचे CCTV Footage Viral झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उमटली. मराठी भाषिक तरुणीला मारहाण करणारा आरोपी परप्रांतिय असल्याने नेटिझन्सच्या क्रोधाची धार अधिकच तीव्र झाली. आरोपी गोकुळ झा याच्याबाबत अधिक माहिती समोर येत आहे. अटक टाळण्यासाठी Gokul Jha ने स्वतःच्या लूकमध्ये बदल केल्याचे समोर आले आहे.

    नेमकं काय घडलं?

    डॉक्टरांच्या केबिनमध्ये एमआर बसले होते. यामुळे रुग्णांना काही काळ आत न पाठवण्याची सूचना रिसेप्शनिस्ट तरुणीला देण्यात आली होती. यामुळेच आरोपी तरुणाला इतर रुग्णांप्रमाणेच तिने थोडा वेळ थांबण्यास सांगितले. मात्र, तरीही तो ऐकत नसल्याने या तरुणीने आरोपीस आत जाण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या गोकुळने Kalyan Marathi Receptionist ला केसांना धरून बेदम मारहाण केली.

    लूक बदलून गुंगारा

    पोलिसांनी गोकुळ झा या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र त्याला अटक झाली नव्हती. मंगळवारी रात्री गोकुळ झा याला अंबरनाथमधील नेवाळी नाका येथून पकडून मनसे पदाधिकारी यांनी मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. नांदिवली परिसरात अनेक जण ओळखत असल्यामुळे Gokul Jha ने लूक बदलून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला, मात्र मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याची धरपकड करत पोलिसांकडे सोपवले. गोकुळसोबत त्याचा भाऊ रंजित झा यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

    कोण आहे गोकुळ झा?

    गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार असून तो 4 दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून जेलबाहेर आल्याची माहिती आहे. त्यानंतर मंगळवारी रुग्णालयामध्ये त्याने तरुणीला मारहाण केली. त्याच्यावर याआधी हत्यार बाळगणे आणि मारहाण करणे यासारखे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत

    तरुणीला पॅरलिसीस होण्याची भीती

    गोकुळने तरुणीच्या मानेवर लाथ मारली होती. जर तिला फ्रॅक्चर किंवा क्रश इंज्युरी झाली, तर पॅरलिसीस होण्याची भीती डॉक्टरांनी वर्तवली आहे. तरुणीला मान हलवताना वेदना होत आहेत. तिचे पाय आणि छातीवरही मारल्याचे वळ उमटले आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा