महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे हे एकाचवेळी मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याचं निमंत्रण दिलं होतं. 2029 पर्यंत आम्ही विरोधात येण्याची शक्यता नाही. पण तुम्हाला सत्तेत यायचं असेल तर स्कोप आहे. आपण ते वेगळ्या पद्धतीने बोलू, असं देवेंद्र फडणवीस भर सभागृहात म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. फडणीसांनी एकप्रकारे ठाकरेंना सोबत येण्याची ऑफरच दिल्याची चर्चा होती. पण उद्धव ठाकरेंनी यावर बोलताना खेळीमेळीने विधान परिषदेचं कामकाज सुरु होतं, असं म्हटलं होतं.
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सोबत येण्याची ऑफर दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विधान भवनातील कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीची का नको याबाबातचं एक पुस्तक देवेंद्र फडणवीस यांना भेट म्हणून दिलं होतं. त्यानंतर फडणवीसांनीदेखील सभागृहात त्या पुस्तकाबाबत माहिती दिली होती. तसेच असं कुणीही कुणाला भेटलं की युती किंवा राजकीय मैत्री होत नाही, असंही फडणवीस यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ऑफर दिल्यानंतर विधान भवन परिसरात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट दिली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना तुम्ही ऑफर दिली म्हणून स्वागताला उभे असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ देखील समोर आला होता.

