• Fri. Mar 6th, 2026

    छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगाराचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह, आईचा टाहो, आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा

    छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगाराचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह, आईचा टाहो, आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा

    Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर शहर एका गुन्हेगाराच्या हत्येच्या घटनेमुळे हादरलं आहे. या घटनेनंतर मृतक गुन्हेगाराच्या आईने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गुन्हेगाराच्या आईने प्रचंड आक्रोश केला. त्या महिलेचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. संबंधित गुन्हेगाराला अज्ञात इसमांनी निर्घृण मारहाण करुन संपवलं. या हत्येमागे नेमकं कोण आहे? ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण या हत्येच्या घटनेमुळे शहर हादरलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 28 वर्षीय गुन्हेगाराचा अर्धनग्न अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तींनी गुन्हेगाराला बेदम मारहाण करून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच मृतकाच्या आईने घटनास्थळ गाठत टाहो फोडला. हा खून नेमका कोणी केला? खून करण्यामागचा उद्देश काय? याचा तपास पोलीस करीत आहे. पण महिलेच्या आक्रोशाने परिसरातील नागरिकांच्या देखील डोळ्यांचा कडा पाणावल्या. यावेळी बघ्यांनी परिसरात मोठी गर्दी केलेली बघायला मिळाली.

    अर्जुन रतन प्रधान असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो 28 वर्षांचा होता. तो आंबेलोहळ येथे राहायचा. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अर्जुनला दोन भाऊ, एक बहीण आणि आई असा परिवार आहे. अर्जुनचे कुटुंबीय कमळापूर परिसरामध्ये राहतात. दरम्यान गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून अर्जुन हा आंबेलोहोळ भागामध्ये राहत होता. आंबेलोहोळ भागात कंपनीत काम करून तो राहत होता. त्याच्यावर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.

    दरम्यान, अर्जुन रतन याचा शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आंबेलोहळ भागामध्ये निर्जनस्थळी मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलं आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलं आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

    आईने फोडला टाहो

    दरम्यान, घटनेची माहिती मिळतच अर्जुनची आई घटनास्थळी दाखल झाली. मुलाचा मृतदेह बघून त्यांनी टाकू फोडला. पोलिसांनी मृतदेहावर कपडा टाकलेला असल्यामुळे आईने मला माझ्या मुलाचा एक वेळेस चेहरा बघू द्या असं म्हणत टाहो फोडला. महिलेचा आक्रोश पाहून स्थानिक नागरीक देखील भावूक झाले. आई-वडिलांचा आपल्या मुलांमध्ये जीव असतो. त्यामुळे आई-वडिलांच्या प्रेमाखातर तरी चांगल्या नितीने काम करावं आणि चांगलं आयुष्य जगावं, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरु होती.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा