• Fri. Mar 13th, 2026
    लाकडाने भरलेली गाडी अडवली, 1 लाख मागितले, ACB ने सापळा रचला अन् टांगा पलटी घोडे फरार

    Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये लाकडाने भरलेले वाहन सोडण्यासाठी वनपाल मनोज कुमावत आणि दोन खासगी व्यक्तींनी लाच मागितली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून शेख अब्दुलला 40 हजार रुपये घेताना रंगेहात पकडले. वनपाल कुमावत आणि दुसरा एक व्यक्ती फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    छत्रपती संभाजीनगर : लाकडाने भरलेले वाहनावर कारवाई न करता ते सोडून देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या वनपाल मनोज त्रिंबक कुमावत, खासगी व्यक्ती सय्यद इमरोज सय्यद खाजा आणि शेख अब्दुल मुजाहिद शेख कबीर या तिघां विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ४० हजार रुपये स्वीकारताना शेख अब्दुल यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने (एसीबी) रंगेहात पकडले तर वनपालासह अन्य एक पसार झाले आहेत.

    तक्रारदाराचे लाकडाने भरलेले वाहन वनपाल मनोज त्रिंबक कुमावत याने ३ जुलै रोजी रात्री उशीरा पकडून सय्यद इमरोज सय्यद खाजा याच्या मालकीच्या चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील एस.के. सॉ मिल येथे लावले. गाडीवर कारवाई न करण्यासाठी आणि गाडी सोडून देण्यासाठी वनपाल कुमावत याने 1 लाख रुपयांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी एसीबीच्या जालना युनिटकडे तक्रार केली. पथकाने 10 जुलैली तक्रारीची पडताळणी केली. यात वनपाल मनोज कुमावत याने सदर वाहनावर कारवाई न करता ते सोडून देण्यासाठी 1 लाखांची मागणी करुन तडतोडी अंती 40 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली हे स्पष्ट झालं. तसेच खासगी व्यक्ती सय्यद याने तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.

    त्यानंतर पथकाने रात्री आठ वाजता सापळा रचला. त्यात वनपाल कुमावत याच्या वतीने खासगी व्यक्ती शेख अब्दुल मुजाहीद शेख कबीर (व्यवस्थापक, एस.के. सॉ मिल) याने 40 हजार रुपये स्वीकारताच त्यास पथकाने पकडले. लाचेच्या रक्कमेसह त्याकडे दोन मोबाइल आढळून आले. तर सापळ्याची चाहूल लागताच वनपाल कुमावत आणि खासगी व्यक्ती सय्यद हे पळून गेले. त्या दोघांचा शोध सुरु आहे.

    ही कारवाई एसीबीचे पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, प्रभारी अपर पोलीस अधिक्षक सुरेश नाईकनवरे, पोलीस उप अधिक्षक बी.एस. जाधवर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, पोलीस कर्मचारी गजानन घायवट, गजानन कांबळे, गजानन खरात, गणेश चेके, शिवलिंग खुळे, भालचंद्र बिनोरकर आदींनी केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा