Virar Rikshaw Driver Viral Video : विरारमध्ये एका रिक्षा चालकाने मराठी बोलण्यास नकार देत हिंदी आणि भोजपुरी भाषेतच बोलण्याची भूमिका घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. विरार रेल्वे स्थानकाबाहेर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित रिक्षा चालकावर कारवाईची मागणी जोर धरत आहे. या घटनेमुळे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.
संबंधित व्हिडीओ हा विरार रेल्वे स्थानक बाहेरचा असल्याची माहिती मिळत आहे. विरार रेल्वे स्थानक बाहेर रिक्षा चालक आणि दुचाकीस्वाराचा हा व्हिडीओ आहे. या दोघांमध्ये मराठी भाषा बोलण्यावरुन वाद होतो. यावेळी संबंधित रिक्षा चालक हा मराठी बोलणार नाही, असं म्हणत आक्रमक होतो. तो प्रचंड द्वेषाने बोलताना दिसतो. रिक्षा चालक अक्षरश: तरुणाला दमदाटी करताना दिसतो.
व्हिडीओत रिक्षा चालक नेमकं काय बोलला?
“मी हिंदी बोलणार, भोजपुरी बोलणार. तुम्हाला काय करायचे ते कर. मी हिंदीत बोलत आहे. मला मराठीत बोलायचं नाही. हिंदीत बोलणार. मीडियाला बोलवा. हिंदीत बोलणार. कसं बोलतो तू, मी मराठी नाही, हिंदीत बोलणार”, असं रिक्षा चालक संबंधित व्हिडीओत बोलताना दिसतोय. त्यावर शेवटी वैतागलेला तरुण “हा माझं चुकलं भाऊ, जाऊदे रे बाबा”, असं बोलत असल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे. विशेष म्हणजे मुजोर रिक्षा चालकाने शिवीगाळदेखील केल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
मराठी आणि हिंदी भाषेवरुन वाद सुरु असतानाच विरारच्या मुजोर रिक्षा चालकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत संबंधित रिक्षा चालक हा आपण हिंदी आणि भोजपुरीच बोलणार, पण मराठी बोलणार नाही, असं आक्रमकपणे बोलताना दिसतोय. त्याचा मुजोरपणा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. #Marathi #Hindi #Virar pic.twitter.com/o3iUyYlRhy
— Maharashtra Times (@mataonline) July 8, 2025
मीरा भाईंदरमध्ये हिदी-मराठीवरुन मोठ्या घडामोडी
दरम्यान, मराठी आणि हिंदी भाषा बोलण्यावरुन महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. मीरा भाईंदर परिसरात तर हा वाद रस्त्यावर आलेला बघायला मिळतोय. मीरा भाईंदर इथे एका व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी मराठी भाषा बोलण्यास येत नसल्यावरुन मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. संबंधित व्हिडीओ मनसे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जाते? असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्याने महाराष्ट्रात सगळ्या भाषा बोलल्या जातात, असं म्हटलं होतं. त्याने मराठीत बोलण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या मनसे आंदोलकांनी व्यापाऱ्याला मारहाण केली होती.
संबंधित मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर व्यापाऱ्यांचा मीरा रोडमध्ये मोठा मोर्चा निघाला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आज मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि इतर मराठी संघटनांचा मोर्चा निघाला. विशेष म्हणजे मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. यानंतर अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी धरपकड केली. या मोर्चावरुन मोठा राडा झाल्यानंतर अखेर मीरा भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा निघाला. या सगळ्या घडामोडी सुरु असताना आता विरारच्या एका रिक्षा चालकाचा मुजोरपणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

