Ratnagiri Crime News : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने या शिक्षकाला निलंबित केले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान या सगळ्या प्रकरणात गंभीर दखल घेत जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी या शिक्षकाच तातडीने निलंबन केलं आहे. किशोर येलवे असे या नराधम संशयित शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांकडून त्याला न्यायालयात करण्यात आले. न्यायालयाने त्याची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी रत्नागिरी येथे करण्यात आली आहे.
दाभोळमध्ये एका जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने इयत्ता ५ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत अश्लील वर्तन केलं आहे. दाभोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही विद्यार्थिनी घरी निघाली होती. शाळेतील या शिक्षकाने तिची विचारणा करत तुला घरी नेण्यासाठी कोण आले नाही का? असं विचारलं. त्या मुलीकडून नाही असे उत्तर येताच हा शिक्षकही तिच्या मागोमाग घराकडे गेला. शिक्षकाने त्याच्या दुचाकीवरून तो विद्यार्थिनीच्या घराकडे गेला.
घरी गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की घरी कोणी नाही याचाच फायदा उचलत नियत फिरलेल्या या नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिच्या शरीरावर हात फिरवत लज्जा उत्पन्न होईल अशी अश्लील कृती करत कोणाला सांगू नको अशी धमकीही दिली. घाबरलेल्या या विद्यार्थिनीन घडला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर घरी आई-वडिलांना हा सगळा प्रकार कळतात त्यांनी थेट दाभोळ पोलीस स्टेशन गाठत या शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली.
दाभोळ पोलिसांनी शिक्षक किशोर येलवेला अटक केली आहे. पॉस्को कायद्याचे कलम 8/10 आणि बीएनएस ७४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये कोणत्याही मुलाचे लैंगिक शोषण झाल्यास, कलम ८ अंतर्गत गुन्हा ठरतो, तर एखाद्या मुलीचे लैंगिक शोषण झाले असेल, तर कलम १० नुसार, दोषी व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. अटकेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास तातडीने सुरू केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास दाभोळ सहायक पोलीस निरीक्षक अमोल गोरे करत आहेत. दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आलेला शिक्षक या मुलीला घरी सोडण्यासाठी दुसऱ्यांदा घरी गेला होता. याआधी देखील या मुलीला सोडण्यासाठी हा शिक्षक घरी आला होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

