• Thu. Jun 18th, 2026

    माता न तू वैरिणी, पैशांसाठी 5 वर्षाच्या मुलाला विकले, रत्नागिरी जिल्हा हादरला

    माता न तू वैरिणी, पैशांसाठी 5 वर्षाच्या मुलाला विकले, रत्नागिरी जिल्हा हादरला

    Ratnagiri Crime News : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एका मातेने पैशांसाठी आपल्या पाच वर्षांच्या मुलाला विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी महिलेसह खरेदी करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. विकलेल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन सुरक्षित आश्रमात ठेवले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. संबंधित घटनेची सध्या जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरु आहे. आईला आपल्याला बाळाला विकताना काहीच कसं वाटलं नसेल? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. एका पाच वर्षाच्या मुलाला विकल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. याप्रकरणी दापोली पोलिसांनी एका महिलेसह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सगळ्या धक्कादायक प्रकारात संशयित आरोपी अरबिना सुफियान पांजरी (वय-24 वर्षे) या महिलेने दुसरा संशयित आरोपी सत्यवान दत्ताराम पालशेतकर याला या मुलाला विकल्याचे या घटनेत समोर आल आहे. त्यामुळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दापोली तालुक्यातील हर्णे परिसरातून या सगळ्या धक्कादायक प्रकरणात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. या सगळ्या प्रकारची फिर्याद हर्णै पोलीस दुरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल पंकज फुलचंद पवार यांनी दाखल केली आहे. आर्थिक फायद्यासाठी आपल्याच 5 वर्षांच्या मुलाला विकल्याप्रकरणी एका मातेसह एका व्यक्तीविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास गुहागर येथील एसटी स्टँडसमोर हा प्रकार घडल्याची माहिती तपासात समोर आली आहे. संशयित आरोपी महिला हिने तिच्या ५ वर्षाच्या मुलाला आर्थिक फायद्यासाठी आरोपी सत्यवान दत्ताराम पालशेतकर याला विकले. सत्यवान पालशेतकर याने सदर बालकाची खरेदी केल्याचेही तपासात समोर आला आहे.

    या गंभीर प्रकरणाची दखल घेत दापोली पोलिसांनी गुन्हा बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ८१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, दापोली तालुका पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनानुसार दापोलीच्या सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक शुभांगी हिरेमठ या सगळ्याचा अधिक तपास करत आहेत. या सगळ्या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली असून याप्रकरणी विकण्यात आलेल्या बालकाला सुखरूपरित्या ताब्यात घेऊन सुरक्षित आश्रमात ठेवण्यात आल आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा