Devendra Fadnavis Speech : भाजप नेते रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईत मोठा कार्यक्रम आयोजित करुन रवींद्र चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधत भाजप कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष असल्याचे सांगितले. रवींद्र चव्हाण यांनी युवा मोर्चा, नगरसेवक ते प्रदेशाध्यक्ष असा प्रवास केला असून, त्यांच्या नियुक्तीमुळे कोकणातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची भावना आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“रवींद्र चव्हाण यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं. युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम सुरु केलं. नगरसेवक झाले, स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. चार वेळा आमदार झाले. भाजपचे महामंत्री झाले. आज भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. माझ्यासोबत मंत्रिंडळात राज्यमंत्री आणि नंतर मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. रवींद्र चव्हाण यांच्यात जिद्द आणि चिकाटी आहे. ते धाडसी आहेत”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं कौतुक केलं.
“मला आज अनेक लोकं भेटले, त्यांनी भावना प्रकट केली, इतके वर्ष आम्हाला वाटायचा की एकतरी कोकणी भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला पाहिजे. आमच्या कोकणात एकही भाजपचा प्रदेशाध्यक्ष झालेला नाही. ती कमतरता रवींद्र चव्हाण यांनी भरुन काढली. आमचा आज कोकणातील नेता भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला”, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
नाना पटोलेंच्या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल उत्तर, सभागृहात हास्यकल्लोळ
“गेल्या अनेक वर्षांमध्ये दिलेली जबाबदारी पूर्ण करणं, 24 तास पक्षाचा विचार करणं, त्यांच्या डोक्यात कायम भाजपच आहे. म्हणून मला विश्वास आहे त्यांच्या नेतृत्वात भाजप आणखी वेगाने विस्तार करेल. त्याचवेळी मी चंद्रशेखर बावनकुळे यांचंही मी मनापासून अभिनंदन करेन. ज्याप्रकारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाची धुरा हातात घेतल्यानंतर पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचून पक्षाला उभं करण्याचं काम केलं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

