• Sat. Mar 7th, 2026

    प्रदेशाध्यक्षपद देऊन भाजपने माझ्यावर उपकार केले, रवींद्र चव्हाण भाषणात नेमकं काय म्हणाले?

    प्रदेशाध्यक्षपद देऊन भाजपने माझ्यावर उपकार केले, रवींद्र चव्हाण भाषणात नेमकं काय म्हणाले?

    Ravindra Chavan : भारतीय जनता पार्टीने रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. मुंबईत भाजपच्या पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांची निवड घोषित करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. रवींद्र चव्हाण यांनी या निवडीबद्दल पक्षाचे आभार मानले. आपली प्रदेशाध्यक्षपदी निवड करुन पक्षाने आपल्यावर उपकार केल्याचे ते म्हणाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : भाजपच्या गोटात आज मोठ्या घडामोडी घडत आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आता पक्षाकडून नव्या नेत्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाने भाजप नेते रवींद्र चव्हाण यांना प्रदेश कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. यानंतर पक्ष प्रदेशाध्यक्षपदाची निवड पक्षाकडून करण्यात येणार असल्याची बातमी समोर येत होती. अखेर पक्षाने महाराष्ट्राचा नवा प्रदेशाध्यक्ष ठरवला आहे. रवींद्र चव्हाण यांना भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपकडून मुंबईत मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी भाषण करताना पक्षाने आपल्यावर उपकार केल्याचं वक्तव्य केलं.

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे आभार मानले. तसेच आपल्याला हे पद देऊन पक्षाने आपल्यावर उपकार केल्याचं रवींद्र चव्हाण म्हणाले.

    अखेर भाजपनं भाकरी फिरवली, रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय नंदू परब यांना मोठी जबाबदारी

    रवींद्र चव्हाण भाषणात नेमकं काय म्हणाले?

    “माझी सर्वांना विनंती आहे, कधीच रवीदादा आगे बढो किंवा कधीच रवी चव्हाण आगे बढो असं नाही, फक्त भाजपा आगे बढो असंच म्हटलं पाहिजे. माझी आज या पदावर निवड झाली आहे, खरंतर भारतीय जनता पार्टीने मला हे पद देऊन माझ्यावर उपकार केले. मी हे सांगतोय कारण माझ्याबरोबर काम करणाऱ्या त्या त्या वेळेच्या असंख्य कार्यकर्त्यांना जाण आहे. माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी आहे. मी काय होतो त्यावेळचा काळ आणि आज एवढ्या मोठ्या पक्षाच्या प्रमुख पदावर मला संधी दिली. मी 2002 साली पक्षाच्या कामाला सुरुवात केली. तिथून काम करत, एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता भाजपचा अध्यक्ष होतो हे कुठल्याच पक्षात होणार नाही. त्यामुळे हे माझ्यावर उपकार आहेत”, असं रवींद्र चव्हाण म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा