Maharashtra Unseasonal Rain : राज्यात अनेक भागांमध्ये आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले बघायला मिळाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. तसेच जालन्यात वीज कोसळल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची देखील दुर्दैवी घटना घडली आहे.
शहर परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दिवसभर प्रचंड उकाडा जाणवला. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेनंतर सिडको, उस्मानपुरा, चिकलठाणासह शहर परिसरात पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे अनेक भागात झाडे उन्मळून पडली तर होर्डिंगचे देखील नुकसान झाले. चिकलठाणा परिसरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५ मिमी पावसाची नोंद झाल्याचे चिकलठाणा वेधशाळेने सांगितले. तर सेव्हन हिल परिसरात ३ मिमी, गांधेली परिसरात ३ मिमी आणि पडेगाव परिसरात ४२.२ मिमी पावसाची नोंद झाल्याचे एमएमजी हवामान विभागाचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दौलताबाद, अब्दीमंडी, शरणापूर, मिटमिटा, पडेगाव परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात कृष्णपुरवाडी परिसरात घरावरचे पत्र उडून गेले. त्यात एक महिलेला दुखापत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच खुलताबाद तालुक्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे पळसगाव येथील एका घरावरील पत्रे उडाले. वैजापूर, कन्नड, सिल्लोडसह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.
जालन्यात दोघांचा मृत्यू
जालना जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात वीज पडून जालना जिल्ह्यातील मौजे कोठा कोळी (ता. भोकरदन) येथील सचिन विलास बावसकर आणि गणेश प्रकाश जाधव या दोघांचा मृत्यू झाला तर अन्य एक जखमी आहे. तर नांदेड जिल्ह्यातील मौजे डोंगरगाव (ता. नायगाव) येथील य्यद बंदगी पटेल यांच्यावर झाड कोसळल्याने ते जखमी झाले. तसेच शिवराज अशोकराव जाधव यांच्या पायाजवळ वीज पडल्याने ते भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे प्रशासनाने सांगितले. तर बीडमध्ये रात्री आठ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली तर लातूर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली.
अवकाळी पावसात वीज पडून लातूर जिल्ह्यात दोन दिवसात १६ पशूधन दगावले. यामध्ये सात म्हशी, सहा शेळ्यांचा आणि गाय , बैलाचा समावेश असल्याचे विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सुत्राकडून सांगण्यात आले. तर जालन्यात वीज पडून तीन मेंढ्या तसेच म्हैससह अन्य चार जनावरे दगावले.
वीज गुल
सिडको एन सात परिसरात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे झाडे उन्मळून पडले. एक झाडे विद्युत पोलवर पडल्याने पोल वाकले असून परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. यासह उत्तरानगरी, पोलिस कॉलनी, पॉवर हाउस, वसंत भवन, सिटी चौक, समर्थनगर, औरंगपुरा, पोलिस आयुक्तालय, जयभवानीनगर, सुरणानगर, गणेश कॉलनी, पैठणगेट, म्हाडा कॉलनी, रोशनगेट, पन्नालालनगर, गजानन मंदिर परिसर आदी वीजपुरवठा खंडित झाला होता. तर सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास जळगाव रोड वरील मोठ्या होडींगचे बॅनर फाटून विजेच्या डीपी लगत आणि तारांवर चिपकलेले. त्यामुळे टीव्ही सेंटर आणि जाधववाडी परिसर यामध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज पुरवठा पुर्ववत सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आल्याचे महावितरण विभागातर्फे सांगण्यात आले.

