• Sat. Mar 14th, 2026
    महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, छगन भुजबळ सकाळी मंत्रिपदाची शपथ घेणार

    Chhagan Bhujbal Taking Oath As Minister : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, अशी मोठी बातमी आता समोर येत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, अशी मोठी बातमी आता समोर येत आहे. राज्याच्या राजकारणात छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून बॅक फूटवर आले होते. मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांनी वारंवार आपली नाराजी व्यक्त देखील केल्याचं बघायला मिळालं होतं. यानंतर आता छगन भुजबळ यांचं आता पक्षाकडून राजकीय पुनर्वसन होताना दिसत आहे. राज्याच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचा महत्त्वाचा चेहरा म्हणून छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी दिली जात असल्याची चर्चा आहे.

    राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी याबाबत महत्त्वाचं परिपत्रक देखील जारी केलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांचा शपथविधी समारंभ आयोजित केल्याची माहिती या परिपत्रकात जारी करण्यात आली आहे. मुंबईत राजभवन येथे हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाचं मोजक्याच जणांना निमंत्रण असणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

    छगन भुजबळांना कोणतं खातं मिळणार?

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. स्वत: भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती. या दरम्यान, भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दुरावा आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मधल्या काही काळात भुजबळ ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील की काय, अशी देखील चर्चा होती. पण नंतर काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांचं अजित पवार यांच्यासोबत मनोमिलन झाल्याची देखील माहिती समोर आली. अखेर अजित पवारांनी भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. भुजबळ सकाळी 10 वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

    काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे मंत्रिमंडळात एक जागा रिक्त झाली होती. याच जागेवर आता छगन भुजबळांची नियुक्ती होणार आहे. तसेच भुजबळांना पुन्हा एकदा अन्न आणि नागरी पुरवठा खातं मिळण्याची शक्यता आहे. याबाबत उद्या काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे. उद्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही अनपेक्षित राजकीय घडामोडी बघायला मिळतात का? ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed