• Sat. Jun 27th, 2026

    टॉवेल कारखान्यातील आगीत दोन राज्यातील प्रसिद्ध उद्योजक उस्मान मंसुरींचा कुटुंबासह होरपळून मृत्यू

    ByMH LIVE NEWS

    May 18, 2025
    टॉवेल कारखान्यातील आगीत दोन राज्यातील प्रसिद्ध उद्योजक उस्मान मंसुरींचा कुटुंबासह होरपळून मृत्यू

    Solapur News : सोलापुरात एका टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली. या दुर्घटनेत हाजी उस्मान मंसुरी यांच्या कुटुंबातील सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंसुरी हे सेंट्रल हॅण्डलूम इंडस्ट्रीजचे मालक होते आणि त्यांचा व्यवसाय महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पसरलेला होता. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुऱ्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. या घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

    (फोटो– Lipi)

    इरफान शेख, सोलापूर : सोलापूर शहरातील एका टॉवेल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत दोन राज्यातील प्रसिद्ध उद्योजक हाजी उस्मान मंसुरी यांचा कुटुंबासह आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात सेंट्रल हॅण्डलूम इंडस्ट्रीजचा टॉवेल निर्यात होत होता. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुऱ्हाण यांनी घटनास्थळी भेट देत दुःख व्यक्त केले आहे. अशा प्रसिद्ध उद्योजकांचा कुटुंबासह असे होरपळून मृत्यू होतो तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न पडला आहे. रविवारी पहाटे लागलेल्या आगीत हाजी उस्मान मंसुरी, अनस मंसुरी, शिफा मंसुरी, युसूफ मंसुरी या मंसुरी कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाला आहे.

    दानशूर उद्योजक हरपला

    हाजी उस्मान मंसुरी हे चाळीस वर्षांपूर्वी गुजरात राज्यातून सोलापुरात व्यापार करण्यासाठी आले होते. सोलापूरचे वातावरण हॅण्डलूम उद्योगासाठी पोषक असल्याने उस्मान मंसुरी यांनी टॉवेल कारखाना सुरू केला होता. सेंट्रल इंडस्ट्रीज नावाने त्यांनी मोठा कारखाना सुरू केला होता. सोलापूरसह महाराष्ट्र राज्यात मुंबई,गुजरात आदी ठिकाणी सेंट्रल इंडस्ट्रीजचा टॉवेल खुप प्रसिद्ध होता. जवळपास 400 ते 500 कर्मचारी त्यांच्या वेगवेगळ्या कारखान्यात काम करत होते. लॉकडाऊन सारख्या बिकट परिस्थिती हाजी उस्मान मंसुरी यांनी सोलापूर शहरातील गोरगरीब नागरिकांना भरपूर मदत केली होती. एक दानशूर उद्योजकाचा होरपळून मृत्यू झाल्यानं सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.

    घटनेची चौकशीची मागणी केली

    राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे नेते वसीम बुऱ्हाण संध्याकाळी सोलापूर अक्कलकोट रोडवर असलेल्या एमआयडीसीत भेट दिली. “कारखान्याला भीषण आग लागली, त्यांना वाचवता आले नाही, हे दुर्दैवी आहे. सोलापूरच्या इतिहासात कधीच एवढी मोठी जीवितहानी झाली नाही. त्याबाबत चौकशी करावी अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे करणार आहोत”, असं वसीम बुऱ्हाण म्हणाले.

    दरम्याम, रेस्क्यू टीममध्ये काम केलेले माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी या घटनेतील मन हेलावणारी माहिती दिली. कारखाना मालक हाजी उस्मान मंसुरी हे आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मास्टर बेडरूममधील बाथरूममध्ये जाऊन लपले होते. त्यांचा दीड वर्षाचा नातू युसुफ याला काही होऊ नये यासाठी त्यांनी नातवाला मिठीत कवटाळून घेतले होते. पण या आगीत त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed