Vijay Wadettiwar on Pahalgam Attack : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यावरून वादग्रस्त विधान केले. हल्लेखोरांनी धर्म विचारला होता का, असे ते म्हणाले. यावर टीका झाल्यावर त्यांनी भूमिका बदलली. दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. हल्ल्याचा उद्देश देशात तेढ निर्माण करणे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शिक्षक भरती घोटाळ्याची ईडी चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
त्यापूर्वी वडेट्टीवार यांनी “दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का?” असे विधान करत खळबळ उडवून दिली. “काही पर्यटक सांगत आहेत की दहशतवाद्यांनी गोळ्या झाडण्यापूर्वी लोकांना धर्म विचारला तर काहीजण सांगतायत की असे काही घडलेच नाही. सत्ताधाऱ्यांकडून भारत-पाकिस्तान असा जप चालला असतो. त्यांनी आता सांगावं की या हल्ल्याची जबाबदारी कोणाची? हा हल्ला म्हणजे सरकारचं अपयश असल्याचं सरकारने स्वीकारावे”, असं म्हटलं.
“पहलगाममध्ये जे काही घडले, २७ जण त्या हल्ल्यात मारले गेले. पहलगाममध्ये, काश्मीर खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था का नव्हती? तिथली सुरक्षा व्यवस्था का हटवली? अतिरेकी देशाची सीमा ओलांडून २०० किलोमीटरपर्यंत आत घुसले आणि आपल्या लोकांना त्यांनी मारले. हे सगळे होत असताना मोदी सरकार काय करत होते? त्यांची गुप्तचर यंत्रणा काय करत होती,” असे प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.
‘शिक्षक भरती घोटाळ्याची ईडी चौकशी करा’
वडेट्टीवारांनी सध्या राज्यात गाजत असलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याची ईडी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. “यासाठी एसआयटी नेमकी गेली पाहिजे. उच्चस्तरीय चौकशी होऊन यात जे संस्थाचालक दोषी आहेत, शिक्षक विभागाची यंत्रणा दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करा. मात्र, ज्यांनी घोटाळे केले नाही त्यांना वाचवण्यासाठी निरपराध माणसाचा बळी घेऊ नका,” असेही ते म्हणाले.

