Asawari Jagdale : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पावलेले संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा आधार दिला आहे. दु:खात असलेल्या जगदाळे कुटुंबियांना मदत करण्यासाठी त्यांनी तातडीने पाऊल उचलले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शिफारसीमुळे संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे यांना डी. वाय. पाटील संस्थेत नोकरी मिळाली आहे.
संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना डी. वाय. पाटील संस्थेत नोकरी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष अजित पाटील यांना फोन करुन आसावरी जगदाळे यांच्या नोकरीची शिफारस करण्यात आली. यानंतर डी. वाय. पाटील समूहाकडून आसावरी जगदाळे यांना नोकरी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
‘माझे वडील कुटुंबाचा आधार होते’
पहलागममध्ये हल्ला झाला त्यावेळी पुण्याचे जगदाळे कुटुंबिय तिथेच होते. आसावरी जगदाळे या देखील आपल्या आई-वडिलांसह तिथे होत्या. त्यांच्यासमोर दहशतवाद्यांनी त्यांच्या वडिलांवर गोळ्या झाडल्या. या भयानक घटनेमुळे जगदाळे कुटुंबिय हादरले आहेत. दहशतवाद्यांनी एका मुलीसमोर तिच्या वडिलांना गोळ्या झाडून हत्या करणारं भयंकर क्रूर कृत्य केलं. या कृत्यामधून जगदाळे कुटुंबिय लगेच सावरणं कठीण आहे. हल्ल्यानंतर जगदाळे कुटुंबिय पुण्यात परतलं तेव्हा आसावरी जगदाळे यांनी आपल्याला आलेला थरारक अनुभव सांगितला होता. यावेळी माध्यमांसमोर बोलताना आसावरी यांनी आपले वडील हेच कुटुंबाचे आधार होते, असं सांगितलं होतं.
मुख्यमंत्र्यांनी जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली तेव्हाही आसावरी यांनी हा मुद्दा मांडला असावा. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आसावरी यांना नोकरी देण्याचं आश्वासन दिलं असावं. यानंतर आसावरी जगदाळे यांना खरंच डी. वाय. पाटील संस्थेत नोकरी मिळाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीमुळे आसावरी यांना नोकरी मिळाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलपणावरही नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.

