Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमध्ये गेलेले प्रवासी पहलगामजवळ रस्ता खचल्याने बचावले. रस्ता खचला नसता, तर मोठी दुर्घटना घडली असती, असा अनुभव पर्यटकांनी सांगितला. भारतीय लष्कराच्या जवानांमुळे सुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली, असेही काही पर्यटक म्हणाले.
जम्मू-काश्मीरमधील प्रवाशांना राज्य सरकारने दोन विशेष विमानांनी मुंबईत गुरुवारी आणले. २५२ पर्यटक मुंबईत दाखल झाले. मुंबईहून आठ ई-शिवनेरीने त्यांना स्वगृही सोडण्यात आले. हे प्रवासी मुंबई, भांडुप, वसई रोड, नालासोपारा, शहापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, नागपूर येथील होते.
Pahalgam Terror Attack : हिंदू की मुस्लिम? कुराण वाचता? प्लॅन ए फेल झालाय, ३५ बंदुका खोऱ्यात… खेचरवाल्याबाबत पर्यटकाचा दावा
‘पुण्यातील ३० पर्यटकांसह जम्मूला रेल्वेने पोहोचलो. यानंतर रस्तेमार्गे श्रीनगर गाठले. श्रीनगरमध्ये पर्यटन केल्यानंतर पहलगामभेटीचे नियोजन होते. मात्र हल्ल्याच्या दोन दिवसाआधी पहलगाम येथे जाणारा रस्ता खचल्याने ही भेट टळली. दरम्यान, पर्यायी मुघल रोडने तेथे पोहोचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचदरम्यान दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार केल्याचे समजले. रस्ता खचला नसता, तर हल्ल्याच्या वेळी आमचाही जीव गेला असता,’ असा अनुभव अथर्व टूर्सचे व्यवस्थापक सचिन जाधव यांनी मांडला.
Pahalgam Attack : तंबूत लपलेलो, त्यांनी वडिलांना बाहेर बोलावलं, अजान म्हणायला सांगितली अन्… पुण्यातील लेकीच्या डोळ्यासमोर बापावर गोळीबार
…आणि सुखरूप मुंबईत आलो
‘आमच्यासोबत महाराष्ट्र, गुजरातमधील सर्वाधिक आणि त्यानंतर आसाम, बंगालमधील पर्यटकही होते. हल्ल्यानंतर लष्कराला तातडीने पाचारण केल्याने धीर मिळाला. विमानतळावर पोहोचेपर्यंत सर्व नातेवाईकांचे फोन खणखणत होते. विमानतळावर मोठी गर्दी उसळली होती. राज्य सरकारने विशेष विमान उपलब्ध करून दिले आणि सुखरूप मुंबईत दाखल झालो,’ असे राधाबाई धनकडवे यांनी सांगितले.
Pahalgam Attack : मुलाला पत्नीकडे द्यायला सांगितलं, नंतर ओळख विचारली; भारत नाव ऐकून गोळी मारली, पत्नी-मुलासमोरच संपवलं
‘काश्मीर आपले आहे’
‘पहलगामपासून १० किलोमीटर अंतरावर असताना पुढे जाता येणार नसल्याचे सांगण्यात आले. हॉटेलमध्ये पोहोचल्यावरदेखील मनात प्रचंड भीती होती. ही भीती मुंबईत पोहोचल्यावर नाहीशी झाली. भारतीय लष्कराच्या जवानांवर पूर्ण विश्वास आहे. भविष्यात काश्मीरची सहल नक्कीच पूर्ण करू. कारण काश्मीर आपले आहे,’ असे पर्यटक अतुल देशपांडे यांनी सांगितले.
Pahalgam Attack : तर आम्ही जिवंत आलोच नसतो… पहलगामला जाण्याआधी रस्सा खचला आणि बचावले; मुंबईकर कुटुंबाला अश्रू अनावर
प्रवाशांच्या सेवेसाठीच
पहिले विशेष विमान गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता आणि दुसरे विमान साडेदहाच्या सुमारास आले. पहिल्या विमानामध्ये १७५ पर्यटक आणि दुसऱ्या विमानात ७७ पर्यटक आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवासी वाहतूक विनाअडथळा पूर्ण करण्याचे काम एसटीचालक वरिष्ठाच्या मार्गदर्शनाने सातत्याने करत आहेत. या आधी करोनाकाळात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणणे, अतितीव्र पावसामुळे रेल्वेवाहतूक खोळंबल्यानंतर शहरातून उपनगरात प्रवासी वाहतुकीची जबाबदारी महामंडळाने सुरक्षित पूर्ण केली आहे.

