• Fri. Mar 13th, 2026
    मेंढरं चारणाऱ्या बिरुला आयपीएस झाल्याचा फोन आणि यमगेचा धनगरवाडा उजाळला, मेंढपाळाच्या मुलाचं लख्ख यश

    Success Story of UPSC Crack Birdev Dhone : बिरदेव ढोणे या होतकरु तरुणाचा वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय त्यामुळे लहानपण शेळ्या-मेंढ्यांच्या पाठीमागे फिरूनचं गेलं. मात्र पठ्ठ्याने आता आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. मेंढपाळाच्या पोरांनं मिळविलेल्या लख्ख यशात समस्त धनगरवाडा उजळून निघाला आहे.

    (फोटो– Lipi)

    नयन यादवाड, कोल्हापूर : बिरदेव ढोणे या होतकरु तरुणाचा वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय त्यामुळे लहानपण शेळ्या-मेंढ्यांच्या पाठीमागे फिरूनचं गेलं. शाळेत मात्र पोरानं चुनूक दाखवली आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मुरगूड केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. अभ्यासात लहानपणापासूनच रुची असणारा बिरदेव बारावीत विज्ञान शाखेतही अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाला. त्यानंतर पुण्यात स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केलं आणि अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून राजधानी दिल्ली गाठली. दोन प्रयत्नात अपयश आलं मात्र जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक अभ्यासाच्या बळावर कोल्हापुरातील कागल तालुक्यातील यमगे गावचा बिरदेव ढोणेनं यूपीएससीचं मैदान मारलं आहे.

    मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात ५५१वा रँक घेऊन पठ्ठ्याने आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. बिरदेवला भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्याचा मित्राचा फोन आला. तेव्हा तो बेळगावजवळील एका धनगरवाड्याजवळ मेंढरं चारत होता, ही वार्ता जेव्हा यमगे गावी पोहोचली तेव्हा गावचा धनगरवाडा मेंढपाळाच्या पोरांनं मिळविलेल्या लख्ख यशात उजळून निघाला आहे.

    कागल तालुक्यातील यमगे येथील सिद्धाप्पा ढोणे हे वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय करतात. मुलांनी शिकून मोठ अधिकारी व्हावं, यासाठी ढोणे दांपत्याने मुलगा बिरदेव याला लहानपणापासूनच चांगलं शिक्षण मिळावं, यासाठी प्रयत्न केले. बिरदेव यांनीही आई-वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत शैक्षणिक कारकीर्दीत घवघवीत यश मिळवलं होतं. पुण्यात उच्च शिक्षण पूर्ण करून दिल्लीत बिरदेव गेली ४ वर्ष यूपीएससीची तयारी करत होता, दोन प्रयत्न करूनही बिरदेवला यश मिळालं नव्हतं मात्र त्याने अभ्यासात सातत्य ठेवत यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५५१ वा रँक मिळवत भारतीय पोलीस सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केलं आहे.

    UPSC Crack Birdev Dhone : मेंढरं चारणाऱ्या बिरुला आयपीएस झाल्याचा फोन आणि यमगेचा धनगरवाडा उजाळला, मेंढपाळाच्या मुलाचं लख्ख यश

    गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या बिरदेवला घरात पुरेशी जागा न मिळाल्याने कधीकाळी व्हरांडात बसून अभ्यास करावा लागला होता. अशी आठवण वडील सिद्धाप्पा ढोणे यांनी सांगितली. तर गेली चार वर्ष नियमित पुस्तक आणि वर्तमानपत्रांचे सखोल वाचन, दोन परीक्षांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे झालेल्या चुका टाळून जास्तीत जास्त स्तरावर भर दिल्याचं बिरदेव ढोणे याने सांगितलं. दोन दिवसानंतर मूळ गावी ढोणे परिवार परतणार आहे. यावेळी त्याचे जंगी स्वागत करण्याचं नियोजन गावकऱ्यांनी केलं आहे.

    दिल्लीतील मित्राचा फोन आणि आनंदाला उधाण

    मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्लीतील सहकारी मित्रांनी फोन द्वारे बिरदेव ढोणे याला तू आयपीएस झाला आहेस अशी आनंदवार्ता दिली. यावेळी ढोणे कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही, आयपीएस झाल्याचा फोन आला तेव्हाही बिरदेव ढोणे घरची मेंढरं राखत होता, बेळगावजवळ असल्यामुळे दोन दिवस पायी प्रवास करून ते मूळ गावी पोहोचणार आहेत. यावेळी त्याच्या स्वागताची जय्यत तयारी गावकऱ्यांनी केली आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed