Minister Dada Bhuse Big Announcement About Hindi Language : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. हिंदी भाषा बंधनकारक असणार नाही, असं मंत्री दादा भुसे म्हणाले आहेत. हिंदी भाषा’ अनिवार्य’ या शब्दाला आम्ही स्थगिती देतोय, असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे. सुधारित शासन निर्णय जारी करणार असल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं आहे. मराठी, इंग्रजीसह ज्यांना हिंदी शिकायचं असेल त्यांना हिंदी शिकवली जाईल. पण हिंदी शिकवण्याबाबत कोणतंही बंधन नसेल, असंही दादा भुसे म्हणाले आहेत.
दादा भुसे नेमकं काय म्हणाले?
जे हिंदीसाठी इच्छुक असतील त्यांना हिंदी भाषेचा पर्याय देऊ, असं दादा भुसे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. इतर भाषेबाबत त्या वर्गातील किती विद्यार्थ्यांची मागणी येते त्याचा सखोल अभ्यास करुन त्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल, असंही दादा भुसे यांनी सांगितलं. तसेच “आपण हिंदी केवळ एवढ्याकरता घेतलं होतं की, मराठी सोबत मिळतंजुळतं आहे, देवनागरी लिपी आहे. या संदर्भातील पुढचा सुधारित शासन निर्णय लवकरच निर्गमित केला जाईल”, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, सरकारच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. “सरकारने आधी विचार करुन निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती. पण सरकारने हा निर्णय मागे घेतला यासाठी सरकारचे धन्यवाद! महाराष्ट्रात दुसरी तिसरी कोणती भाषा चालणार नाही. महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार”, अशी प्रतिक्रया राज ठाकरेंनी दिली आहे.

