• Wed. Mar 18th, 2026

    Rohit Pawar यांच्या मतदारसंघात ‘राजकारण’, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचे स्वागत

    Rohit Pawar यांच्या मतदारसंघात ‘राजकारण’, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचे स्वागत

    Ajit Pawar VS Rohit Pawar : अजित पवार रोहित पवार यांच्या मतदारसंघात दाखल होताच त्यांच्या समर्थकांनी अजित पवारांचं स्वागत केलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या घटनेवर आता रोहित पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अहिल्यानगर : उपमुख्यमंत्री अजित पवार आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेडमध्ये फक्त राष्ट्रवादीतच नव्हे, तर रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं. अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या समर्थकांनी अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनल लावले होते. तसेच अजित पवार कर्जत जामखेडमध्ये दाखल होताच रोहित पवारांच्या समर्थकांनी अजित पवार यांचं स्वागत केलं. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीवेळी रोहित पवार हे चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले होते. पण निवडणुकीनंतर गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा सातत्याने समोर येत आहेत. रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनेत अपेक्षित पद न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी या चर्चांचं खंडन केलं होतं. पण यानंतर आज त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांचं स्वागत करण्यात आलं आहे. यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रया दिली आहे.

    रोहित पवार यांची प्रतिक्रिया काय?

    “नगराध्यक्ष माळी समाजाचे आहेत. ते माझ्यासोबत आहेत. ते भाजप आमदार राम शिंदे यांना आवडत नाहीत. एक नगरपंचायत तुमच्याकडे यावी यासाठी राजकारण केलं जात आहे. माझा आवाज दाबण्यासाठी राम शिंदे यांना विधान परिषदेचे आमदार केलं. त्यानंतर सभापती केलं. स्वागताला गेलेले कार्यकर्त्यांच्या हातात एक पत्र आहे, त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात जो निधी मंजूर करण्यात आला होता त्याची मागणी करण्याबाबत, तसेच मतदारसंघातील प्रश्न आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून देण्यासाठी कार्यकर्ते भेटल आहेत”, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

    “ज्यांनी हे बॅनर्स लावले आहेत त्यांना आता शोधत आहोत. काही लोकांना सामाजिक काम नसल्यामुळे त्यांनी असे बॅनर्स लावले आहेत. अजित पवार तिकडे आले आहेत त्याचा आनंद आहे, ते माझे काका देखील आहेत”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed