Jalgaon Crime News: जळगावात एका चोरीच्या घटनेचा पर्दाफाश करताना पोलिसांनी एका टोळीचा भांडाफोड केला. या टोळीचा मास्टरमाईंड हा एक पोलीसच असल्याचं समोर आलं आणि पोलीसदलात एकच खळबळ माजली.
चोपडा बसस्थानकावर ड्युटी करत असताना, प्रवाशांच्या सुरक्षेतील त्रुटी हेरून प्रल्हाद पिरोजी मानटे नामक या कथित पोलीस कर्मचाऱ्याने चोरीच्या योजना आखल्या. त्याने काही सराईत चोरांना हाताशी धरून राज्यातील विविध बस स्थानकांवर चोरी करण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू ठेवल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
Gadchiroli News: वेगात झाडावर आदळली अन् दुचाकी जळून खाक, दोन सख्ख्या भावांचा एकत्र अंत, कुटुंबाचा आक्रोश
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोरी प्रकरणात सहभागी असलेला संशयित सहाय्यक उपनिरीक्षक प्रल्हाद पिरोजी मानटे हा जालना जिल्ह्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात ग्रेड पीएसआय म्हणून कार्यरत होता. एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याचाच चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
या घटनेच्या अनुषंगाने चोपडा शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत चारचाकी गाडीसह या चारही संशयित चोरांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रल्हाद मानटे याचाही समावेश आहे. आता पोलीस मानटे आणि त्याच्या टोळीने यापूर्वी किती ठिकाणी अशा प्रकारे चोऱ्या केल्या आहेत, याचा कसून शोध घेत आहेत. हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे. एका पोलीस अधिकाऱ्याचाच चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाल्यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
चोपडा विभागाचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपींना अटक केली आहे आणि या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पोलीस मानटेच्या मागील गुन्हेगारी इतिहासाची आणि त्याच्या टोळीच्या कार्यपद्धतीची माहिती काढली जात आहे.

