• Thu. Jul 30th, 2026

    Nashik Accident: नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे गेला निष्पाप नागरिकाचा बळी; ट्रकच्या धडकेनंतर दुचाकीस्वाराचा मृत्यू

    Nashik Accident: नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे गेला निष्पाप नागरिकाचा बळी; ट्रकच्या धडकेनंतर दुचाकीस्वाराचा मृत्यू

    जयेश साबळे, नाशिक : सध्या नाशिक शहरात खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला असतानाच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने आता आणखी एक बळी घेतला आहे. अंबडगाव औद्योगिक परिसरातील एक्सलो पॉईंटजवळ अंबड गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास खड्डा चुकवण्याच्या नादात एका ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात निलेश कोतकर या ४० वर्षीय दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, आनंदनगर, कामटवाडा परिसरात राहणारे आणि एका खाजगी कंपनीतील कर्मचारी असलेले ४० वर्षीय दुचाकीचालक निलेश कोतकर यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली होती. या अपघातात कोतकर हे गंभीर जखमी झाले होते. या अपघातात त्यांच्या छाती, हात आणि चेहऱ्याला गंभीर जखम झाली होती. घटनेची माहिती मिळताच कंपनीतील सहकारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने कोतकर यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

    कोतकर कुटुंबातील कर्ताधरता पुरुष हा शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांचा बळी ठरला आहे. निलेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होताच त्यांच्या मित्राने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात ट्रकचालकाविरोधात बुधवारी रात्री एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रकचालक अद्याप फरार आहे.

    दरम्यान, अपघातातील संशयित ट्रकचालकाविरोधात गुन्हा तर दाखल झाला, परंतु खड्ड्यांना तसेच रस्त्यांच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? त्यांच्यावर काही कारवाई होणार की नाही? असा संतप्त सवाल आता नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.

    आधीच खड्डे, त्यात रम्बलर्सचा त्रास!

    सिंहस्थाची कामे अन् पावसामुळे शहरभरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिककर आधीच त्रस्त झालेले आहेत. त्यातच महापालिकेने रस्तोरस्ती रम्बलर्स (रम्बल स्ट्रिप्स) टाकून नाशिककरांच्या मार्गात अडथळ्यांची शर्यत अधिक वाढवली आहे. रस्त्यांची वाट लावलेल्या एका ठेकेदाराला तब्बल दहा कोटींचे कंत्राट देऊन खोदल्या जाणाऱ्या रस्त्यांवरच रम्बलर्सची ‘पेरणी’ केली जात असल्याने ‘खड्डे झाले थोडे, त्यात रम्बलरचे घोडे’ अशी नाशिककरांची अवस्था झाली आहे.

    शहरातील रस्त्यांवर दीड हजारपेक्षा अधिक गतिरोधक असताना नियमांची ऐशीतैशी करून आतापर्यंत २४० ठिकाणी रम्बलर्स बसविण्यात आले असून, १५० ठिकाणी ते प्रस्तावित आहेत. त्यामुळे ठेकेदारासाठी केलेली उधळपट्टी सध्या शहरात चर्चेचा विषय बनली आहे. नाशिक शहरात सध्या सिंहस्थानिमित्त दीड हजार कोटी रुपये खर्चुन २८ प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.