मुंबई, दि. 15 : थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी लवकरच प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले .
निर्मल भवन येथे थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र बाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू श्रीरंग नायक तसेच मंत्रालयातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या म्हणणे थॅलेसेमिया आजारावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात थॅलेसेमिया मुक्तीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.या उपक्रमांद्वारे थॅलेसेमिया सारख्या गंभीर अनुवंशिक आजारावर नियंत्रण मिळवून, महाराष्ट्राला या आजारापासून मुक्त करण्याचा राज्य शासनाने निर्धार केला आहे.
जनजागृतीचे विशेष अभियान
थॅलेसेमिया आजाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्यभर व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरापासून ते शहरांपर्यंत विविध माध्यमांतून माहिती दिली जाणार आहे. थॅलेसेमियाच्या निदानासाठी खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये काही विशिष्ट तपासण्या अनिवार्य केल्या जाणार आहेत. यामुळे वेळेवर निदान होऊन पुढील पिढीत हा आजार पसरण्यापासून रोखता येईल.
थॅलेसेमिया आजाराचे निदान, व्यवस्थापन आणि समुपदेशन यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकाधिक कर्मचाऱ्यांना विशेष कार्यशाळांद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे गावागावांपर्यंत या आजाराविषयी योग्य माहिती पोहोचवता येईल.
थॅलेसेमिया झालेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यावेळी लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी या आजारावरील सविस्तर माहितीच्या सादरीकरण केले.
०००००००
राजू धोत्रे/विसंअ