• Wed. Apr 23rd, 2025 6:38:18 AM

    कुरकुंभ एमआयडीसीत अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा – कामगारमंत्री ॲड.आकाश फुंडकर

    ByMH LIVE NEWS

    Apr 15, 2025
    कुरकुंभ एमआयडीसीत अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा – कामगारमंत्री ॲड.आकाश फुंडकर

    मुंबई, दि १५ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कुरकुंभ (ता. दौंड जि. पुणे) येथील औद्योगिक क्षेत्रात संयुक्तरित्या मोहीम राबवून कारखान्याद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचे नमुने घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. या मोहिमेमध्ये संबंधित ग्रामपंचायत प्रतिनिधीसुद्धा घ्यावेत. एमआयडीसीत अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी दिले.

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने कामगार विभागाने बैठक आयोजित करणे तसेच पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथील अल्कली अमाइन्स कंपनीमध्ये नुकताच झालेला स्फोट आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात उद्योग विभाग, पर्यावरण विभाग आणि कामगार विभाग यांची बैठक कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस आमदार राहुल कुल, कुरकुंभ एमआयडीसीमधील संबंधित अधिकारी, रासायनिक उद्योग प्रतिनिधी, पर्यावरण विभाग, कामगार विभाग, संबंधित ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    या बैठकीत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती दिली. कुरकुंभ परिसरात बहुसंख्य रासायनिक उद्योग कार्यरत असल्याने संभाव्य अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना आवश्यक असल्याचे मत मंत्री ॲड.फुंडकर यांनी व्यक्त केले. त्यांनी त्वरित उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र पथक गठित करून औद्योगिक परिसराची सखोल तपासणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

    यावेळी आमदार राहुल कुल यांनी एमआयडीसी परिसरातील कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (CETP) संदर्भातील मुद्दा उपस्थित केला. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, जे उद्योग प्रदूषित पाण्याची निर्मिती करतात, तेच उद्योग सीईटीपी चालवतात, यामुळे प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण राहात नाही. याबाबत धोरणात्मक फेरआढावा घेऊन अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करावी आणि आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देश मंत्री ॲड.फुंडकर यांनी दिले.

    कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी फायर ऑडीट संबधित महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ अंतर्गतचे नियम तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी उद्योग विभागासोबत समन्वय साधण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

    कामगार विभागाकडे प्रदूषण नियंत्रण व सांडपाण्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नसल्याने कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी दिले.

    000

    संजय ओरके/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed