• Wed. Apr 23rd, 2025 10:11:22 PM

    मंत्री Sanjay Shirsat यांची Chandrakant Khaire यांना खुली ऑफर; ‘मातोश्री ऐकणार नाही, आमच्याबरोबर या’

    मंत्री Sanjay Shirsat यांची Chandrakant Khaire यांना खुली ऑफर; ‘मातोश्री ऐकणार नाही, आमच्याबरोबर या’

    Sanjay Shirsat Offer to Chandrakant Khaire : “खैरेंना एकच सल्ला आहे. हा न संपणारा विषय आहे. त्यांनी कितीही आदळाआपट केली तरी मातोश्री ऐकणार नाही. म्हणून मी त्यांना मित्रत्वाचा सल्ला दिला होता. सोडा आता ते. तुम्हाला निष्ठेने काम करायची सवय आहे. तुम्ही आमच्याबरोबर या. मी आजही तुम्हाला खुली ऑफर देतोय”, असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. ठाकरे गटात चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात अंतर्गत कलह सुरु आहे. यामुळे खैरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत यावं, असं संजय शिरसाट यांनी आवाहन केलं आहे. दुसरीकडे शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे यांनी खैरेंना पक्षात घेणार नसल्याचं याआधी वक्तव्य केलं आहे. पण त्यानंतर शिरसाटांवी खैरेंना आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे खैरेंबाबत शिंदेंच्या शिवसेनेची नेमकी काय भूमिका आहे? याबाबत ट्विस्ट निर्माण झाला आहे.

    “अंबादास दानवे यांना उबाठाच्या उरलेल्या शिवसेनेवर आपली पकड मजबूत करायची आहे. त्यांना चंद्रकांत खैरे यांना संपवायचं आहे. खैरे यांना कशाबद्दल संताप होऊ शकतो? तर त्यांना कार्यक्रमाला न बोलावल्याने. खैरेंना बोलवायचा नाही, त्यांना फोन करायचा नाही. दानवे हे खैरेंपेक्षा खूप ज्युनियर आहेत. पण तरीही खैरेंचा अपमान कसा करता येईल? हे हेरुन, तसेच अपमान झाल्यावर खैरे रिअॅक्ट होतात म्हणून त्याने तशी चाल केली. खैरेंना कसंही बाजूला काढणं आणि उरलेल्या उबाठा गटावर वर्चस्व स्थापन करणं हा मुख्य हेतू आहे. त्यामुळे संपलेली उबाठा आहे, आता उबाठामध्ये कोण आहेत? खैरे आणि दानवे दोन जण आहेत. या दोघांपैकी सत्ता कुणाची, पक्ष कुणाचा हा अंतर्गत वाद सुरु आहे. पण खैरे हे त्यात उजवे राहतील”, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.

    “मातोश्री कुणाच्या तक्रारी ऐकत नाही. कुणाला वेळ देत नाही. कुणाशी बोलत नाही. आम्ही त्यामुळेच बाहेर गेलो. त्यांना ऐकून घेण्याची सवय नाही. ते कोणताही निर्णय घेत नाहीत. त्यामुळे उबाठा गटाचं अंध:पतन होत चाललं आहे. आज नेमणूक केलं आणि उद्या निघून जातात. चांगल्या पदावरचे लोकं सोडून जात आहेत”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

    “आम्ही आधी सांगत होतो, निर्णय घ्या, काँग्रेस-राष्ट्रवादी सोडा. पण ऐकलं नाही. पक्ष फुटला. आता खैरे बोलल्यामुळे त्यांच्यावर काही परिणाम होईल असं वाटत नाही. त्यांच्याकडे ना काँग्रेस आहे, ना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. अकेला चलोमध्ये सु्द्धा त्यांना कुणी विचारायला तयार नाही. म्हणून खैरे आज बोलले हे आम्ही अडीच वर्षांपूर्वी बोललो होतो”, असं संजय शिरसाट म्हणाले.

    शिरसाटांची खैरेंना खुली ऑफर

    “चंद्रकांत खैरेंना एकच सल्ला आहे. हा न संपणारा विषय आहे. त्यांनी कितीही आदळाआपट केली तरी मातोश्री ऐकणार नाही. म्हणून मी त्यांना मित्रत्वाचा सल्ला दिला होता. सोडा आता ते. तुम्हाला निष्ठेने काम करायची सवय आहे. तुम्ही आमच्याबरोबर या. मी आजही तुम्हाला खुली ऑफर देतोय. आम्हाला राजकारण स्वत:पुरता मर्यादीत ठेवायचं नाहीय. मीच मोठा झालो पाहिजे असा आमचा विचार नाही. प्रत्येक जण मोठं झालं पाहिजे. प्रत्येकाला घेऊन चालणारी मोठी संघटना झाली पाहिजे म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यामुळेच अनेक जण एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आहेत. अनेक लोकं हे शिंदेंच्या पाठिशी आहेत. सोबत नाही आले तर त्यांची इच्छा. मग एक दिवस चंद्रकांत खैरे यांना अंबादास दानवे यांचे जोडे उचलावे लागतील”, असंही संजय शिरसाट म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed