Kolhapur Political News : कोल्हापुरातून मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते तथा कागलचे माजी आमदार संजय घाटगे यांचा उद्या भाजपात प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
संजय घाटगे हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत संजय घाटगे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा न देता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना साथ दिली होती. त्यामुळे संजय घाटगे यांच्यावर पक्षाकडून का कारवाई केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. संजय घाटगे यांनी त्यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांना पाठिंबा देणं अपेक्षित होते. पण त्यांनी महाविकास आघाडीत असूनही मुश्रीफांसाठी काम केल्याची चर्चा होती.
संजय घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपात प्रवेशाची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा रंगली होती. तसेच संजय घाटगे तेव्हाच भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा होती. पण त्यांचा पक्षप्रवेश गेल्या अनेक दिवसांपासून रखडला होता. विशेष म्हणजे संजय घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम केलं होतं. तसेच तो पक्ष सत्तेतही आहे. पण तरीही त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. याबाबत संजय घाटगे हेच सविस्तर अधिकृतपणे प्रतिक्रिया देतील. पण घाटगे यांचा उद्या खरंच भाजप प्रवेश झाला तर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे.
उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष हा सध्या कठीण काळातून जातोय. ठाकरेंच्या अनेक जवळच्या शिलेदारांनी त्यांना पाठ दाखवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ धरली आहे. तरीही ठाकरे खंबीरपणे परिस्थितीला सामोरं जात आहे. असं असलं तरी छत्रपती संभाजीनगर येथे ठाकरेंचे खंदे समर्थक चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील वाद समोर येत आहेत. त्यामुळे पक्षाबाबत नकारात्मक मेसेज जातो. याशिवाय आता कागलच्या माजी आमदारानेदेखील पक्षाला रामराम ठोकल्यास तर ठाकरेंना आणखी मोठा राजकीय धक्का बसेल.