• Fri. Apr 25th, 2025 11:56:07 PM

    राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक स्मरण व अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 13, 2025
    राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक स्मरण व अभिवादन – महासंवाद

    मुंबई, दि. १३ :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचे, विचारांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन त्यांना भावपूर्ण अभिवादन केले आहे तसेच राज्यातील नागरिकांना डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

    भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अलौकिक कार्याचे, विचारांचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “डॉ. बाबासाहेबांनी या देशातील अज्ञान, अनीती, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेदासारख्या कुप्रथांविरुद्ध निर्णायक लढा दिला. या देशातील माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचा हक्क केवळ त्यांच्यामुळे मिळाला. समाजातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क, स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं. ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ या त्यांच्या संदेशानं बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण केलं. डॉ. बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिलं. त्या संविधानानं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, भौगोलिक विविधतेच्या भारताला एकता, समता, बंधूतेच्या सूत्रात बांधण्याचं, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम ठेवण्याचं काम केलं. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेनं गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असा भेदाभेद न करता प्रत्येक नागरिकाला एका मताचा समान अधिकार दिला. प्रत्येक देशवासियाला मानानं, स्वाभिमानानं जगण्याचा हक्क आणि विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणारे डॉ. बाबासाहेब युगपुरुष होते. त्यांचे विचार कुठल्या एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते, अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमध्ये आहे,” असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेबांचा मानवकल्याणाचा विचार पुढे घेऊन जाणं, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा सर्वांगीण विकास करणं हेच डॉ. बाबासाहेबांना खरं अभिवादन ठरेल. देशाच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारणाला आश्वासक दिशा देण्याचं काम डॉ. बाबासाहेबांनी केलं. त्यांच्यासारखे महामानव आपल्या देशात जन्मले, त्यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना दिली हे आपलं भाग्य आहे. डॉ. बाबासाहेब दूरदृष्टीचे नेते होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. ते कायदेतज्ञ, घटनातज्ञ, अर्थतज्ञ होते. लेखक, पत्रकार, चित्रकार, संगीतकार होते. डॉ. बाबासाहेबांनी केलेला महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती दहनाचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिलेले लढे, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतील त्यांची भूमिका; हे सारं देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणांच्या चळवळीतील क्रांतिकारी टप्पे आहेत. डॉ. बाबासाहेबांचे मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहोचावेत; त्यातून देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम रहावी. एकता, समता, बंधूतेचा विचार अधिक मजबूत व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया,” असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दिलेल्या संदेशात केलं आहे.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed